कुडाळ येथे बँकिंग करिअर मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन
स्थानीय लोकाधिकार समिती व आ. वैभव नाईक यांच्या वतीने आयोजन
सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.अंगणवाडी सेविका पदावर नियुक्त होण्यासाठी स्पर्धा आहे. एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून टिकायचे असेल तरी खडतर परिक्षम श्रम घ्यावे लागतात. राजकारणातही आम्हाला स्पर्धेतून जावे लागते. तशीच स्पर्धा तुमच्या जीवनात आहे. पुढील काळात या स्पर्धेचा स्तर उंचावणार आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यादृष्टीने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील परीक्षां संदर्भात मार्गदर्शन व्हावे यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ यांच्या सहकार्याने मार्गदर्शन शिबीर आयोजित केले याचा लाभ विद्यार्थ्यांना होऊन बॅकीग क्षेत्रात निश्चितच यश मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आमचे नेहमीच सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांनीही कोणत्याही परीक्षेला जिद्दीने सामोरे जावे असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले.
⁰
सारस्वत बँकेची होऊ घातलेली स्टाफ भरती तसेच बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ व आमदार वैभव नाईक यांच्या वतीने परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथे घेण्यात येत असून या शिबिराचे उदघाटन शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते तर आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जि.प. अध्यक्ष विकास कुडाळकर,शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर, सौ.श्रेया गवंडे, जीवन बांदेकर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी उमेश नाईक, अनंत भोसले, श्रीराम विश्वासराव, सुधाकर नर, बॅ.नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, प्राध्यपक समीर इनपुरे, प्रा.अमित सरवंडे आदींसह पदाधिकारी शिवसैनिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, आमदार वैभव नाईक हे तरूणाईला एक आदर्श आहेत. शिक्षण, सहकार, राजकीय सर्वच क्षेत्रात त्यांनी यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील सुपुत्राना नोकरी मिळावी या हेतूने स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी लोकाधिकार समितीची स्थापना केली.आ. वैभव नाईक हे दूरदृष्टी असलेला नेता आहे. केवळ राजकारण न करता समाजकारणाच्या माध्यमातून ते अनेक लकोहिताचे उपक्रम राबवित आहेत. आत्मविश्वास यशाची गुरूकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी स्वावलंबी होण्यासाठी स्वतः च्या पारावर उभे राहावे. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी स्पर्धेच्या युगात स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे. कोकण नररत्नांची खाण आहे. संधीचे सोने केल्याशिवाय तरूण तरुणी मागे हटत नाहीत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी यशाच्या दृष्टीने वाटचाल करावी. असे त्यांनी सांगितले
अनंत भोसले म्हणाले, स्पर्धेत उतरायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही.सराव महत्वाचा आहे. अभ्यास केलात तर निश्चितच यश मिळेल. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनत घेतात. ज्ञान फुकट जात नाही. मार्गदर्शन शिबिराचा अनेक परीक्षांमध्ये फायदा होतो.आपण केलेल्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळणार आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये फार मोठी क्षमता आहे फक्त प्रयत्न करा.आ. वैभव नाईक तरुणांच्या पाठीशी उभे आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याच्या त्यादृष्टीने वाटचाल करा असे सांगितले. सुत्रसंचालन प्रा.अरूण मर्गज व आभार प्रदर्शन उमेश गाळवणकर यांनी केले.