सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा -2020 ही रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 व दुपारी 3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे. विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली, एस.एम. हायस्कूल कणकवली या उपकेंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
या परीक्षेस येताना विद्यार्थ्यांनी पुढील साहित्या सोबत आणावे. काळ्या शाईचे बॉल पॉईंट , पेन्सिल व आयोगाने परवानगी दिलेले साहित्या, प्रवेश पत्र आणणे अनिवार्य आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड किंवा स्मार्क कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स या पैकी किमान एक मूळ ओळखपत्र व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणावी,
परीक्षा केंद्रावर पुढील साहित्य आणू नये. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लू टूथ, दूरसंचार साधन म्हणून वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वह्या, नोट्स, परवानगी नसलेली पुस्करे, बॅग्ज, पॅड, पाऊच, परिगणक इत्यादी प्रकारचे साहित्य, साधने परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच परीक्षा कक्षात आणण्यास व बाळगण्यास मनाई आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेच्या किमान दीड तास अधी उपस्थित रहावे.
सदरची परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, फॉक्स केंद्र, ध्वनी क्षेपक सकाळी 8.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीत बंद ठेवण्यात यावीत. तसेच परीक्षेच्या उपकेंद्रावर व आवारात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी, कणकवली यांच्या मार्फत मनाई आदेश लागू करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे या कळवितात.