सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचा उपक्रम
सावंतवाडी
सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबविल्या जातात. या उपक्रमाद्वारे समाजहित जपण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या द्वारे केला जातो. आजकाल विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचा अभाव दिसतो, कदाचित हा टीव्हीचा दुष्परिणाम असू शकतो.
परंतु वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने प्रतिष्ठान द्वारे यापूर्वी ८ शाळांमध्ये “शब्दगंध” या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये वाचनालय सुरु करण्यात आले. हे वाचनालय विद्यार्थ्यांनीच विद्यार्थ्यांसाठी चालवलेले वाचनालय असे याचे स्वरूप असते. या वाचनालयाचे नियंत्रण त्या प्रशालेतील विद्यार्थीच करतात. शिक्षक पालकांच्या भूमिकेत असतात. विद्यार्थ्यांद्वारे या उपक्रमास उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा उपयोग अनेक प्रकारच्या स्पर्धांसाठी जसे वक्तृत्व, निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा पुस्तक परीक्षण ई साठी केलाच परंतु साधी सोपी सुटसुटीत गोष्टीस्वरूपतील पुस्तके असल्याने त्यांना वाचनाची आवड देखील निर्माण झाली.
हा उत्साहवर्धक प्रतिसाद लाभल्याने प्रतिष्ठान द्वारे यावर्षी पुन्हा ६ शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्याचे ठरविले योजिले. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे क्रमांक १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली क्रमांक ५, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओटवणे क्रमांक २, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव क्रमांक १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माडखोल क्रमांक २ धवडकी, व जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केसरी, या शाळेमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. यावेळी पेटी व कुलुपकिल्लीसह १४९ पुस्तकांचा संच प्रत्येक प्रशालेस देण्यात आला.
तसेच याच “शब्दगंध” उपक्रमांतर्गत सावंतवाडीतील नागरिकांना आव्हान करण्यात आले होते की, शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी आपल्याकडील सुस्थितीत असणारी पुस्तके प्रतिष्ठानला द्यावी. प्रतिष्ठानच्या या आवाहनास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अनेक पुस्तके जमा झालीत. ही पुस्तके जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओटवणे क्रमांक ४, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भैरववाडी – कारिवडे, माध्यमिक विद्यालय देवसू, पु. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय कारिवडे, वि स खांडेकर माध्यमिक विद्यालय भटवाडी-सावंतवाडी व ज्ञानमंदिर वाचनालय कलंबिस्त, यांना प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाचे जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षकवृंद व ज्ञानमंदिर वाचनालयाच्या समितीने कौतुक करून आभार व्यक्त केले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सीए लक्ष्मण नाईक, दीपक गावकर, रवी जाधव, भगवान रेडकर, भार्गवराम शिरोडकर, अँड्र्यू फर्नांडिस, सिद्धेश मणेरिकर व डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी परिश्रम घेतले.