You are currently viewing अवघे 18 दिवस शिल्लक…

अवघे 18 दिवस शिल्लक…

बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) दोन दिवसांचा संप पुकारलाय. खरं तर काही सरकारी बँकांना यापूर्वी विलीन करण्यात आलंय. तर काही बँका अजूनही विलीन करायच्या आहेत. विलीनीकरणासाठी जाहीर झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्रा बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. विलीनीकरणामुळे या सरकारी बँकांचे चेकबुक आणि पासबुक 1 एप्रिलपासून बदलणार आहे. अशा परिस्थितीत जर आपले सरकारी बँकांमध्ये खाते असेल तर आपल्याकडे केवळ 18 दिवस शिल्लक आहेत. या दिवसांमध्ये आपणास आपले चेकबुक आणि पासबुक बदलून घ्यावे लागेल, अन्यथा आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 

*18 दिवसांच्या आत पूर्ण करा हे काम, अन्यथा…*

 

बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर ग्राहकांचा खाते क्रमांक, ब्रँचचा पत्ता, चेकबुक, पासबुक यासह अनेक गोष्टींमध्ये बदल केला जातो. बँक आपल्या ग्राहकांनाही महत्त्वाची माहिती देते, जेणेकरून ते वेळेत चेकबूक बदलू शकतील. परंतु आपण अद्याप तसे केले नसल्यास ते 18 दिवसांच्या आत पूर्ण करा.

 

*बँकांनी सतर्कतेचा दिला इशारा..*

 

पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदाने यापूर्वीच आपल्या ग्राहकांना सतर्क केलेय. त्याच वेळी युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि देना बँकेची विद्यमान चेकबुक केवळ 31 मार्च 2021 पर्यंत वैध असतील. म्हणूनच या बँकांमध्ये आपले खाते असल्यास विलीनीकरणानंतर आपल्या खात्यावर देखील परिणाम होईल. कॅनरा बँकेने जाहीर केले आहे की, सिंडिकेट बँकेत विलीनीकरण झाल्यानंतरही चेकबुक 30 जून रोजी ग्राहकांसाठी वैध असेल.

 

*कोणत्या गोष्टी अद्ययावत करणे आवश्यक*

 

जर आपले खातेदेखील या सरकारी बँकांमध्ये असेल तर आपल्याला 1 एप्रिलपूर्वी आपला पत्ता, आपल्या नॉमिनीची माहिती, पत्ता अद्ययावत करावा लागेल. अन्यथा बँकेची कोणतीही माहिती आपल्या मेल किंवा पत्त्यावर येऊ शकणार नाही. कारण आजकाल बँका बहुतेक माहिती मेल किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना पाठवतात.

 

*खात्यांना लिंक करणं देखील आवश्यक*

 

सरकारने बँकांना 31 मार्च 2021 पर्यंत सर्व खाती ग्राहक बेसशी जोडण्यास सांगितलेय. सरकारने म्हटले आहे की, 31 मार्च रोजी जेथे प्रत्येक खात्यात पॅन आवश्यक आणि योग्य असेल तेथे पॅन असावा आणि प्रत्येक खात्यासाठी आधार असावा. जर आपण नेट बँकिंग वापरत असाल तर आपण याद्वारे आपल्या बँक खात्यास आधारसह लिंक देखील करू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा