सत्ताधार्यांनी सहकार्य करण्याची गरज : मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर
कणकवली
मनसेच्या तक्रारी नंतर महसूल प्रशासनाने सिलिका आणि नदी, खाड्यांतून होणार्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई सुरू केली आहे. आता या कारवाईला सत्ताधार्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच जे अधिकारी कारवाई करतात त्यांमध्ये अडथळे न आणता त्यांना कारवाई करु दिली पाहिजे.तरच अवैध वाळू वाहतुकीला लगाम बसेल ,असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष दयानंद मिस्त्री उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू वाहतुकीसाठी बोगस पास तयार केले जात आहेत. ते बारकोडवर मॅच होत नाहीत. त्यामुळे बोगस पास तयार करणार्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत. याबाबत कणकवली प्रांताधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे. कालावल खाडी व इतर भागातही अजून वाळू लिलाव झालेले नाहीत. तरीही दिवसाला शंभर पेक्षा अधिक डंपर मधून वाळू वाहतूक होत आहे. यामागे प्रशासनातील काही शुक्राचार्य कारणीभूत असून डंपरमागे ७०० रुपयांचा हप्ता घेत आहेत.त्यानंतर वाळूचे डंपर सोडले जात आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी,अशी मागणी प्रांताधिकार्यांकडे केल्याचे मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.