You are currently viewing सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…

सिंधुदुर्गवासियांना दिलासा

विशेष संपादकीय…..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेच आमदार, खासदार, मंत्री होऊन गेले, परंतु जिल्ह्याच्या विकासाच्या नावावर ज्यांनी ज्यांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या संस्था, उद्योग, कॉलेज उभारली ती …., जनहीत डोळ्यासमोर ठेऊन कोणीही कामे केलेली आजमितीला दिसून येत नाहीत. आपल्या मंत्रिपदाचा काळ हा संशोधनाचा विषय ठरेल. परंतु याला अपवाद होते ते राज्याचे माजी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर.
कै. भाईसाहेब सावंत राज्याचे आरोग्यमंत्री असताना तेव्हाच्या अखंड रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोक आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत, तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पोचाव्यात यासाठी गावागावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभारली होती. आजही त्यातून लोकांना प्राथमिक उपचार मिळताना दिसत आहेत. त्यामुळे जनमानसात कै.भाईसाहेब सावंत यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. कै.भाईसाहेब सावंत यांनी आरोग्य सुधारणांसाठी ते क्रांतिकारक पाऊल उचलले होते.
त्यानंतर आजपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यात सुधार व्हावा असा प्रयत्न होताना दिसला नव्हता, परंतु मागील पाच सहा वर्षात केसरकर पालकमंत्री झाल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल उचलले ते दीपक केसरकर यांनीच.
मंत्रिपद हातात असल्यावर सत्तेचा उपयोग करून कित्येक नेते स्वतःची मालमत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. एक ना अनेक स्वतःच्या खाजगी संस्था उभ्या करतात आणि पुढील चार पिढ्यांची वाया जाण्याची, बसून खाण्याची सोय करून ठेवतात. हे महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही पहायला मिळतं, दीपक केसरकर मात्र अपवाद ठरले. स्वतःचे हित न पाहता केसरकर यांनी मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्यासाठी जास्तीतजास्त निधी आणण्यासाठी केला. जिह्यातील गोरगरिबांना आरोग्य सेवेसाठी शेजारच्या गोवा राज्यावर अवलंबून रहावे लागते यामुळे अनेक रुग्ण उपचाराविना वाटेत दगावतात. ही बाब ध्यानात घेत त्यांनी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात मंजूर झाले. त्याची पुढील प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. इतर मंत्री, नेते आपल्या पदाचा उपयोग करून उद्योग व्यवसाय उभारतात पण केसरकर यांनी स्वतः पदरमोड करत वडिलोपार्जित व्यवसाय न सांभाळता जिल्ह्यातील जनतेच्या हिताचा विचार केला. त्यामुळे स्वतःच्या व्यवसायात देखील त्यांना मागे जावे लागले. परंतु आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप लावून घेतला नाही, निष्कलंक राहून गोरगरिबांसाठी महत्वाकांक्षी योजना आणण्यातच त्यांनी आपली महत्वपूर्ण कारकीर्द खर्च केली.
दीपक केसरकर हे पिढीजात श्रीमंत घराण्यातील व्यक्तिमत्व. त्यामुळे पैशापेक्षा जनसेवाच त्यांच्या अंगी पूर्णपणे भरलेली आहे. त्यांच्या मवाळ स्वभावाचा अनेक अधिकाऱ्यांनी फायदा घेतला त्यामुळे त्यांनी आणलेल्या निधींचा योग्य विनियोग झाला नाही, परिणामी प्रकल्प रखडले, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत केसरकरांना मंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांच्या विविध योजनांना, प्रकल्पना मात्र गती मिळत आहे. भविष्यात राज्याच्या मंत्रिमंडळात एक अनुभवी, निष्कलंक नेता मंत्री म्हणून पुन्हा एकदा पहायला मिळेल आणि सावंतवाडीला राज्याच्या राजकारणात नेतृत्व मिळेल अशी केसरकर प्रेमींना आशा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा