मालवण
जिल्ह्यातील शेतकऱ्याची व महिला यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता शेतकऱ्यांच्या व महिला बचत गटांनी प्रक्रिया केलेला कृषि प्रक्रिया माल विक्रीकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत कुठेही सरकारी बाजारपेठ उपलब्ध नाही. मुंबई-गोवा महामार्गावर रस्त्याच्या लगत प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस बाजारपेठा बनविण्यात याव्यात अशी मागणी ज्येष्ठ शेतकरी नेते व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब सावंत यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री, सहकार व पणन मंत्री, तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, राज्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, यांच्याकडे लेखी निवेदने केली आहेत.
परंतु अद्याप कुणीही याबाबत साधी दखल सुद्धा घेतलेली नाही! यामुळे आता जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही आहे! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व महिला बचत गटातील प्रतिनिधी, या सर्व सन्मानीय महोदयांनी नियोजित जन आंदोलनात बहुसंख्येने सहभाग घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, श्री बाळासाहेब सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.