You are currently viewing जागतिक महिला दिन….सन्मान महिलांचा…

जागतिक महिला दिन….सन्मान महिलांचा…

विशेष संपादकीय….

खरंतर महिला दिन हे औचित्य आहे, उगवणारा प्रत्येक दिवस हा सुरूच होतो महिलांच्या कर्तव्यदक्षतेपासूनच…. ८ मार्च महिला दिवस, महिलांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस. आई, भगिनी, पत्नी, मुलगी, वहिनी, मावशी, आत्या, मैत्रीण… अनेक रुपात आयुष्यात महिलेचा सहभाग हा असतोच. जन्म देणारी आई, पालनपोषण करून चालायला, बोलायला शिकवणारी आई माया ममतेचा आगर जिच्या हृदयी सदैव असतो ती आई म्हणजेच साक्षात परमात्मा आहे.
स्त्री बहिणीच्या रुपात असेल तर ती प्रेमाचा झरा आहे, आपल्या आयुष्यातील भावावर निस्सिम प्रेम करणारी, त्याच्या सुखासाठी प्रार्थना करणारी स्त्री म्हणजे बहीण. स्त्री पत्नी असेल तर संपूर्ण त्यागाचं, समर्पणाचं प्रतिक आहे. पतीच्या सुखातच आपलं सुख शोधणारी, सोशिकतेचा परमोच्च बिंदू. वहिनी भावनेचा सागर, मावशी, आत्या, मामी स्नेहाचे झरे. मुलगी बापावर सर्वोच्च प्रेम करणारी स्त्री. तर स्त्री मैत्रीण असेल तर सुखाची, विश्वासाची मूर्ती.
स्त्री प्रेमात राधा बनली, संसारात जानकी तर कधी काली बनून शिर सुद्धा धडावेगळे केलं. अशाच कणखर आणि खंबीर महिलांना आज सलाम करावासा वाटतो ज्यांनी काम, कष्ट करून घाम गाळून छोट्यामोठ्या प्रमाणात का होईना स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला आहे. नेटाने आपले घरसंसार चालवतात आणि देशाच्या उन्नतीमध्ये आपला वाटा उचलतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच काही महिला आहेत ज्या राजकारणात, उद्योग व्यवसायात, विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरहिरीने काम करताना पहायला मिळतात. कित्येक स्त्रिया आज मानाने गावाच्या सरपंचपदी विराजमान असून गावाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात बचतगटांची स्थापना करून अनेक महिलांनी रोजगाराची दालने उघडली आहेत. कित्येकांच्या हातांना कामे दिली आहेत.
जिल्ह्यातील काही महिलांनी उद्योग व्यवसायात उतरत उद्योगपती सन्मान मिळवला आहे, गावाच्या, तालुक्याच्या बेरोजगार तरुण तरुणींसाठी व्यवसाय उभारत बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. काहींनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे. समाज सुधारणेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कर्तबगार महिला आपली शेती बागायती सांभाळून, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील काम करताना दिसतात. स्वतःबरोबर इतर गावातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असतात. अशा या सर्व कष्टकरी खंबीर महिलांना जागतिक महिला दिनी संवाद मीडियाचा सलाम….
स्त्री….
करुणेचा सागर,
ममतेचा आगर,
मायेचा झरा,
जीवनाचा…
आधार खरा.
आईची माया,
बहिणीचं निस्सिम प्रेम,
पत्नीचा त्याग,
मैत्रिणीचा अढळ विश्वास…
आपल्या आयुष्यात,
आई, ताई, पत्नी, मैत्रीण, मुलगी, मावशी, मामी, आत्या, काकी
स्त्रीत्वाच्या प्रत्येक रुपात भेटते….
त्या प्रत्येक स्त्रीशक्तीला….
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा