You are currently viewing स्त्री – ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती..

स्त्री – ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती..

स्त्री-ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती

या लेखाची सुरुवात मी माझ्या आईपासूनच करतो . आईला जाऊन आज दोन वर्षे झाली .बऱ्याच गोष्टींचे बीजारोपण आपल्या आयुष्यात आईच करत असते ..तसेच या लेखाचे बीजारोपण माझ्या मनाच्या कोपऱ्यात कधीतरी माझ्या आईनेच केले असावे (कधी🤔 ते आता नक्की सांगता येत नाही ) , पण आत्ता ते माझ्या लेखणीतून फक्त कागदावर उतरत आहे एव्हढेच ..जे काही सुचतेय , जे काही कागदावर उतरतय त्याचे पूर्ण *क्रेडिट* आईचेच आहे , तिने माझ्यात पेरलेल्या त्या सुंदर विचारांचे आहे!

हे बीज म्हणजे असे विचार की ज्यांच्यात कदाचित पूर्ण विश्व बदलण्याची खरी ताकद ! पण जसे एखादे बी पेरल्यावर त्या छोट्या बी मध्ये किती मोठा वृक्ष दडला आहे हे आपल्याला आधी दिसत नाही तसेच विचारांचेही असते !
आईने महत्त्वाचे म्हणजे स्त्री-पुरुष असा भेद कधी शिकविला नाही , तिच्या कृतीतून ही कधी दिसला नाही .त्यामुळे आम्हालाही मोठे होत असताना ही समानतेची दृष्टी आपोआपच मिळाली.
हीच समानतेची दृष्टी आपल्या हिंदू संस्कृती मध्ये ही दिसते .दुर्गा हे शक्तीचे रूप , लक्ष्मी म्हणजे संपत्तीचे रूप तर सरस्वती म्हणजे विद्येचे रूप! शतकानुशतके हिंदू समाज त्यांची मनोभावे पूजा करत आला आहे .इतिहासातदेखील आपण अनेक कर्तृत्ववान स्रिया बघितल्या , जसे राजमाता जिजाऊ , पुण्यश्लोक अहिल्याबाई , झाशीची राणी लक्ष्मीबाई ! त्यामुळे स्रियांना असे सर्वोच्च स्थान देणाऱ्या हिंदू संस्कृतीचा आपल्याला सार्थ अभिमान वाटलाच पाहिजे 🙏

पण जसा मी मोठा होत गेलो , जबाबदाऱ्या अंगावर येत गेल्या तसे हा जो विचार मला आईकडून मिळाला त्याचे *विस्तारित* रूप माझ्यासमोर उलगडू लागले . मी जेव्हा खूप वाचू लागलो , अनुभव घेऊ लागलो मला लक्षात आले की खरे तर स्त्री-पुरुष *समान* *नसतातच* मुळी ! बाह्य रूपाने बघितले तर स्त्री ची व पुरुषाची शरीररचना देवानेच पुर्णतः भिन्न बनविली आहे मग यांच्यात समानता कशी बरे असेल 🤔 ..मुळात साम्यापेक्षा *भेदच* खूप आहेत ..मग आईने दिलेली शिकवण चुकीची होती का ?? इथे विचारांचा थोडा गोंधळ उडाला असे झाले ! पण पुढे अनुभवांनी तो विचार परिपक्व होत गेला …तो विचार असा होता की ~~~ स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली एक *परिपूर्ण* कृती आहे , पण पुरुष मात्र एक *अपुरी* निर्माण झालेली कृती आहे .. _स्त्री स्वतंत्र पणे पूर्ण असते , पण पुरुष मात्र स्त्री वाचून_ _अपूर्ण आहे_ ..पुरुषाला पदोपदी स्त्री ची गरज पडते मग ती आई असेल , बहीण असेल , बायको असेल ,मुलगी असेल ..या सर्व भूमिका स्त्री सारख्याच तन्मयतेने निभावू शकते आणि निभावतेही !
म्हणूनच आपण सर्वांनी हे बघितले असेल की जर एखाद्या घरात जर वडील लवकर गेले तरी आई मात्र मुलांना तेवढ्याच ताकदीने मोठे करते त्या वडिलांच्या मागे ( म्हणजे तो पुरुष नसताना ही ) , हो अर्थातच तिला खूप अडचणी येतही असतील पण त्यातून बाहेर येण्याची *अदभुत सामर्थ्य* तिच्यात असते ..तेच या चित्राला / कल्पनेला उलट करून बघा …जर एखाद्या घरातून आई आधी गेली तर किती गोंधळ उडतो , आयुष्य कशी विस्कटून जातात !
या कल्पनेतून लक्षात येते की स्त्री मध्ये अफाट ताकद असते , तिचा *मानसिक कणखरपणा* तिला कुठल्याही संकटातून बाहेर काढू शकतो .
याच विचाराला पुढे नेताना माझ्या अजून एक खूप मोठी गोष्ट लक्षात आली ..ती अशी की या अशा स्त्री ला *तुच्छ* वा *कमी* समजणे म्हणजे *मनाचे पांगळे* पण आहे .कारण स्त्री ही ईश्वराची पृथ्वीवरील सर्वात सुंदर निर्मिती आहे ..या गोष्टी साठी तो देवही स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत असेल .. कारण जर प्रत्येकाला निर्माण करण्याचे काम देवाने स्वतःच हातात घेतले असते तर त्याला ही सृष्टी निर्माण करायला *युगानुयुगे* लागली असती ..त्यामुळे स्त्री हे त्याचे निर्मितीचे नुसते माध्यम नाही तर ती त्या देवालाच साहाय्य करणारी चालती-बोलती व जणू त्याच्यावरच उपकार करणारी *भलीमोठी अजोड* अशी अद्भुत *निर्मिती* आहे .. बरे ही स्त्री नुसती पुढची पिढी निर्माण करून थांबत नाही , तर त्या पिढीला घडवायचेही काम करते .मग मला विचार आला की तो ईश्वरही कदाचित हा सगळा विचार करून आपल्या स्वतःच्याच निर्मितीपुढेच कधी कधी नतमस्तक होत असेल , नाही का? 🤔
आपल्या हिंदू पुराणात *अर्धनारिंश्वर* ‘ ईश्वराची कथा आहे ..ती या संदर्भात मुळातून वाचण्यासारखी आहे . ब्रह्मदेवाने सुरुवातीला स्त्री शिवाय सृष्टी च्या निर्मितीचा असफल प्रयत्न केला . मग त्याने भगवान शिवाची तपश्चर्या केली . अनेक वर्षे तप केल्यावर शंकर प्रसन्न झाले , तेव्हा त्यांनी स्वतः मधील उमेला ( म्हणजे पार्वतीला ) अर्धे वेगळे काढून ब्रह्माला दिले स्वतः अर्धा पुरुष , अर्धी स्त्री असा झाला , मग पुढे जाऊन त्या अर्ध्या स्त्री च्या मदतीने ब्रह्मा ने सृष्टी ची निर्मिती केली .
तर अशा या स्त्री चे पुढे काळाच्या ओघात काय झाले ? ती स्वतःचे *स्वत्व* हरवून बसली , स्वतःची ओळख , ताकद विसरून गेली ! मग तिला पुरुषांनीच *गुलाम* बनविले . येथे बघा किती ते दुर्देव , जिने आपल्याला निर्माण केले त्याच निर्मितीला गुलाम बनविले गेले .काळे-गोरे , दलित- सवर्ण या भेदापेक्षा स्त्री-पुरुष यांच्यात जो भयंकर भेदभाव झाला त्याकडे कोणीच लक्ष देईनासे झाले ..ती एक साहजिक व रोजच्या आयुष्यातील गोष्ट होऊन बसली . स्त्रीला देखील या भेदभावाची सवय होऊन गेली .उलट काही समाजात तर नवरा मारत नसेल तर तो चर्चेचा विषय झाला . मग पुढे आधुनिक काळ सुरू झाला , स्रिया नोकरी करू लागल्या , स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या ..मग त्या देखील पुरुषांची बरोबरी करू लागल्या ..इथपर्यंत सर्व ठीक होते , पण त्यापुढे जाऊन त्या सिद्ध करायच्या मागे लागल्या की मी देखील कशी पुरुषांसारखीच आहे ! इथेच गल्लत झाली ..फरक विसरल्यासारखा झाला . खरेतर स्रिया त्यांच्या सारख्या नव्हे , तर त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ च किंवा मी तर म्हणेल एव्हड्या श्रेष्ठ की त्यांची तुलना देखील करणे म्हणजे मोठी चूक !
कारण याच स्त्रीला नवनिर्मितीचा जो *अद्वितीय अधिकार* देवाने( किंवा निसर्गाने म्हणा ) दिलाय , तो पुरुषाला कधीच मिळू शकत नाही .त्या अर्थाने ईश्वर व पुरुष हे दोघेही या महान स्त्रीवर अवलंबून आहेत ..तिच्या शिवाय हे दोघेही अपूर्ण आहेत . स्वतःला पुर्ण करायला पुरुषाला स्त्री कडे यावेच लागते यात काय संशय! 🙏
आपण लहान असताना प्रत्येक पाऊल चालताना आईची गरज पडते , मग बहीण आयुष्यात येते . कदाचित ही बहीण जीवनातील पहिली मैत्रिण ही असते , जिच्याशी आपण सगळे share करू शकतो . नंतर लग्न होते , बायको येते , जिच्याशिवाय तर आपले पान ही हलत नाही ..मग पुढे मुलीचा प्रवेश आयुष्यात होतो , वडील-मुलीच्या या नात्यात आपणच *उजळून* निघतो ..अशी किती रूपे या स्त्रीची ..आत्या , मावशी , काकू आज्जी … अशी किती नाती व त्याची किती प्रेमळ रूपे !
तर मला मनापासून वाटते की खरेतर अशी विविध प्रकारची रूपे घेऊन येणारी ही स्त्रीच पुरुषांचा आधार असते , पण समाजात वावरताना उलट समजतात की स्त्रीचा आधार पुरुष आहे म्हणून .. किती दैवदुर्विलास हा !

शेवटी परत आईचेच रूप माझ्या डोळ्यासमोर येतेय ! तिची कितीतरी कणखर रूपे समोर येतात ! त्यातल्या त्यात तर मला असे वाटते की आपण स्वतः आई किंवा बाप झाल्याशिवाय आपल्या आईबापाचे खरे महत्त्व वा त्याग आपल्याला खऱ्या अर्थाने समजतच नाही .. मला आता तर आई अशी एखाद्या अष्टभुजा देवीसमान भासते , किती किती प्रकारच्या अडचणी सोसून तिने आम्हाला मोठे केले , ते आता स्वतः वर जबाबदारी आल्यावर कळते आणि तेच काम आता बायकोही करत आहे , शेवटी ती ही आईच आहे , ईश्वराची सर्वात सुंदर निर्मिती ! पुढे हेच काम तिची मुलगी , तिची सून करेल , ती ही त्याच प्रकारचे बीजारोपण करेल , पुढच्या पिढीचा मोठा वृक्ष निर्माण करण्यासाठी !

© हेमंत सदाशिव सांबरे

*Contact No* -9922992370 .
Email id – camsambare@gmail.com .
To read my other articles/poems pls visit my blog👇👇

www.blogspot.com

प्रतिक्रिया व्यक्त करा