कुडाळ :
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांच्या हिताकरिता नेहमी प्रयत्नशील असते आणि याचा प्रत्यय बॅ.नाथ पै स्कूल ऑफ नर्सिंग मधील ANM च्या विद्यार्थिनींच्या संदर्भात आला. सन २००९-१० ते २०१०-११ या शैक्षणिक वर्षात ANM अभ्यासक्रम पूर्ण करताना NRHM अंतर्गत शिष्यवृत्ती व विद्यावेतन ही शासनाने केलेली आर्थिक मदत, शिक्षणक्रम पूर्ण झाल्यानंतर शासनाने आरोग्य सेवेत रुजू करून घेऊन ती केलेली आर्थिक मदत त्यांच्या वेतनातून कपात करून घेणे, अशा योजनेचा ज्या विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. अशा विद्यार्थिनींना गेली नऊ वर्षे आरोग्य सेवेत रुजू करून घेतले नाही. परंतु केलेली आर्थिक मदत परतफेड करण्यासाठी सिव्हिल सर्जन कडून नोटिसा बजावल्या गेल्या. त्यामुळे अन्यायग्रस्त विद्यार्थिनीं सौ. शुभांगी सुधाकर धुरी, सौ. प्राजक्ता गुरव तसेच बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर आणि नर्सिंग प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. सुमन करंगळे यांनी आज पालकमंत्री ना. उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या प्रसंगी पालकमंत्री यांनी अन्यायग्रस्त विद्यार्थीनी आणि संस्थेचे अध्यक्ष, प्राध्यापक यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सिंधुदुर्ग सिव्हिल सर्जन यांना याबाबत विद्यार्थिनींच्या विनंतीनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले व विद्यार्थिनींवर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासनही दिले व कोणत्याही विद्यार्थिनी कडून नियमबाह्य कोणतीही आर्थिक परतफेडीची वसुली केली जाणार नाही व आर्थिक परतफेड करावयाची असल्यास रोजगार देऊन मगच केली जाईल असे सांगितले.
यावेळी अन्यायग्रस्त विद्यार्थिनीनतर्फे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि नर्सिंग प्राध्यापिका यांनी परिचारिका विद्यार्थिनींच्या समस्येबाबत पालकमंत्री यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयाबाबत आभार मानले.