प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रोत्सवास शनिवारी पहाटे प्रारंभ झाल्या नंतर रात्री महाप्रसादाचा मुख्य सोहळा रात्री ९.३० वाजता सुरू झाला. प्रसादाची ‘ताटे लावणे’ या नावाने ओळखला जाणारा हा कार्यकम अनुपम्य असा सोहळा असतो.जत्रे दिवशी आंगणेवाडीतील प्रत्येक लहानथोर मंडळींचा उपवास असतो. प्रत्येक घराघरात महाप्रसाद बनविला जातो. प्रत्येक घरातील सुहासिनी मौनव्रत धारण करत हा बनवलेला प्रसाद नैवेद्य म्हणून घेऊन मंदिरामध्ये येतात. यालाच ताटे लावणे असे म्हणतात.
या सुहासिनीच्या डोक्यावरील असलेल्या प्रसादाच्या ताटाला कुणाचा धक्का लागू नये म्हणून महत्वाची एक व्यक्ती सोबत असते. रात्री १० च्या सुमारास देवालयात महाप्रसाद घेऊन आलेल्या सवाष्ण महिला पुन्हा आपल्या घरी माघारी फिरल्या.शनिवारी रात्री ९ नंतर धार्मिक विधीसाठी दर्शन रांग बंद करण्यात आली. महाप्रसादाचा ताटे लावण्याचा कार्यक्रम झाल्या नंतर रात्री ११.३०वाजता पुन्हा दर्शन रांग चालू करण्यात आली. यावेळी गोंधळ विधी देवालयात झाला. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे रात्री आंगणे कुटुंबियांच्या घरी होणाऱ्या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी गावा बाहेरील भाविकांना प्रसाद मात्र घेता आला नाही. रात्री सुद्धा पोलीस प्रशासनाने आंगणेवाडीत येणाऱ्या मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला होता.