वैभववाडी
ग्राहक चळवळीचे काम करताना ग्राहक केंद्रबिंदू असला पाहिजे. समाजामधील अडलेल्या नडलेल्या ग्राहकांना मदत करणे, त्याला मार्गदर्शन करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कार्यकारिणीची पहिली सभा जिल्हाध्यक्ष प्रा. श्री. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि.६ मार्च रोजी महाराजा हाॕटेल, कणकवली येथे संपन्न झाली.
राज्यसंस्थेने सिंधुदुर्ग जिल्हा नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. नूतन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख, डिजिटल ओळखपत्र वाटप, संस्थेच्या माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे प्रकाशन व बॕच वाटप तसेच संस्थेच्या पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवणे यासाठी या सभेचे आयोजन केले होते. या सभेला संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सीताराम उर्फ दादा कुडतरकर, सहसंघटक (महिला) सौ. वैदेही जुवाटकर, सचिव श्री.संदेश तुळसणकर, सहसचिव (महिला) सामिया चौघुले तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंके, सदस्य प्रा. श्री. विनायक पाताडे, अंकिता गोरुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला सर्वांचे स्वागत व ओळख करून देण्यात आली. त्यानंतर ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेतची ओळख व कार्यक्षेत्र याबाबत प्रा.श्री.एस.एन पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.१५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरा करणे व तहसिल कार्यालयातील कार्यक्रमात सहभागी होणे. अशा विविध विषयांवर चर्चा होऊन जिल्ह्यातील कणकवली, देवगड, मालवण व वेंगुर्ला तालुका शाखा स्थापन करणे. तसेच संवाद समन्वयात ग्राहक कल्याण या तत्त्वाने काम करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी फोनवरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. शेवटी सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी सर्वांचे आभार मांडले.