*सातबारावरील वारस व फेरफार नोंदी करताना पैशाशिवाय जनतेची कामं होत नाहीत ही वस्तुस्थिती राज्यसरकारच्या प्रतिनिधींनी मान्य केल्याबद्दल मनसेकडून आमदार वैभव नाईकांचे अभिनंदनच..!*
*”चणे” दिल्याशिवाय शासन दरबारी फाईल पुढे सरकली जात नाही या परिस्थितीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची अनास्थाच कारणीभूत… मनसेची घाणाघाती टीका*
कुडाळ :
सातबारावर वारस नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी वेळकाढुपणा करत लोकांना नाहक त्रास देतात, आर्थिक व मानसिक पिळवणूक करतात, तलाठी कार्यालयात तलाठ्यापेक्षा कोतवाल जास्त हस्तक्षेप करतात, दीड-दोन वर्षे वारस नोंदी केल्या जात नाहीत, ऑनलाईन सातबारामध्ये चुकीच्या नावाची नोंद झाल्याने त्यांची दुरुस्ती करून देण्यास कारणे सांगितली जातात असे आरोप आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान केले. जिल्हात ही वस्तुस्थिती आहे ह्यात दुमत नाही मात्र राज्य सरकारचेच प्रतिनिधी अशाप्रकारे हतबल होऊन माध्यमांसमोर व्यथा मांडत असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा नेमकी कोणाकडून करावी हे तरी आमदार महोदयांनी जाहीर करावे.
अलीकडेच कुडाळ तालुक्यातील कसाल येथील मंडळ तलाठी अधिकारी श्री. हांगे याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी आहे. ह्यात लक्षवेधी बाब म्हणजे सदरच्या कारवाईनंतर कसाल पंचक्रोशीतील जनतेकडून पेढे वाटून व फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला गेला; म्हणजेच जनता या भ्रष्ट कारभाराला किती विटली आहे याचा बोध राज्यकर्त्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे. याविरोधात लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी व कर्तव्ये ओळखून गंभीरपणे प्रशासकीय यंत्रणा हाताळल्यास जनतेचा त्रास कमी होईल. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात मनसे नेहमीच आक्रमक असून जनतेच्या पिळवणूकीविरोधात सक्त कारवाई करण्याची इच्छा आमदार महोदय दाखवत असतील तर मनसे या मोहिमेत आपल्या सोबत आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग शासकीय निधी हडपल्याच्या “परमार” प्रकरणातही आमदार महोदयांनी स्वतः जातिनिशी लक्ष घालून कठोर कारवाई होऊन भ्रष्टाचार विरोधी लढ्यात एक कारवाईचे उदाहरण स्थापित व्हावे असे आवाहन मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.