३ ते १८ वयोगटातील अंगणवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण
सावंतवाडी
जिल्हा परिषदतर्फे शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास मळगाव येथे मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे.या सर्वेक्षणात ३ ते १८ वयोगटातील अंगणवाडी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांचे, स्थलांतरीत होऊन आलेल्या आणि गेलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जात आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे व सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रासहीत प्रत्येक गावी हे सर्वेक्षण सुरू आहे. त्याप्रमाणे मळगाव येथेही प्रत्येक वाडीनुसार या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या हद्दीत असलेल्या कुटुंबांचे त्या शाळेमार्फ़त सर्वेक्षण केले जात आहे. यात कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, शून्य ते अठरा वयोगटातील सदस्यांची संख्या, कोरोना कालावधीत मुंबई किंवा बाहेरील गावातून कोण स्थलांतरीत होऊन आल्यास किंवा स्थलांतरीत होऊन गेल्यास त्याची माहिती घेतली जात आहे. तसेच यावेळी ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य मुले आहेत का, याचीही माहिती गोळा केली जात आहे. तसेच मुंबई किंवा बाहेरील गावातून स्थलांतरीत मुलांची तिकडच्या शाळेत नोंद असल्यास किंवा त्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असल्यास तसेच गावी असूनही शाळेपासून दूर असलेल्या मुलांची माहिती गोळा केली जात आहे.