कोकण हायवे समन्वय समितीकडून अभ्यास अहवाल सुपूर्द
मालवण–
कोकण हायवे समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने
दिल्ली येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत कोकण हायवेचा ( मुंबई- गोवा) अभ्यास अहवाल नितीन गडकरी याना सुपूर्द केला.
समितीच्या सर्व सूचनांचे मंत्री महोदय यांनी स्वागत केले. या संपूर्ण अहवालाचा अभ्यास करून सर्व मुद्दे एकत्रितपणे मंत्री महोदयांकडे द्यावेत अशा स्वरूपाचे निर्देश श्री गडकरी यांनी सचिवांना दिले.सर्व मुद्द्यांचा अभ्यास करण्याकरता अधिकार्यांची एक टीम कोकणात येऊन सर्व गोष्टी प्रत्यक्ष पाहिल व यात जे जे शक्य आहे ते सर्व केले जाईल अशा स्वरूपाचे आश्वासन नितीन गडकरी यांनी कोकण हायवे समन्वय समितीला दिले अशी माहिती ग्लोबल कोकण अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिली. यावेळी रायगड जिल्ह्यातून ग्लोबल कोकण चे संचालक किशोर धारिया, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उद्योजक डॉ दीपक परब उपस्थित होते .
हायवे समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पंडित यांच्या समन्वयातून मंगेश नेने, संतोष ठाकूर, प्रसाद पटवर्धन, युयुत्सु आर्ते, जगदीश ठोसर व अन्य कार्यकर्त्यांच्या मदतीने हा अभ्यास अहवाल बनविण्यात आला आहे.
हायवेवर अपघात होतील अशी अनेक धोकादायक ठिकाणे आणि वळणे आहेत. अनेक नाक्यावर भरपूर ट्राफिक आहे पण सर्विस रोड किंवा वाहने पलीकडे जाण्यासाठी अंडरपास नाहीत, पळस्पे ते इंदापूर ८५ किमीचे काम आणि त्यापुढील
आरवली ते वाकड हे जवळपास ९०किमीचे काम अपूर्ण स्थितीत आहे या बाबत लक्ष वेधण्यात आले. देशाचे माजी उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी सुद्धा या अहवाला संदर्भात नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले आहे.
कोकण हायवे अधिकाधिक दर्जेदार व्हावा यासाठी हायवे समन्वय समितीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकजी चव्हाण आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना येत्या कालावधीत भेटण्याचे निश्चित केले आले आहे अशी माहिती संजय यादवराव यांनी दिली.