जमावबंदीचे कारणास्तव ५ मार्च रोजी नगरपालिकेत कामगारांसमवेत बैठक ;मुख्याधिकाऱ्यांची माहिती;मालवण मनसेचा आंदोलनाला पाठिंबा
मालवण
मालवण नगरपालिकेतील स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार, कचरा वाहन चालक यांचे तीन- चार महिन्यांचे वेतन ठेकेदारांनी थकीत ठेवल्याने या कंत्राटी कामगारांनी छेडलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले. न्याय मिळत नसल्याने कामगारांनी आजपासून उपोषणास बसण्याचा दिलेला इशारा जमावबंदीच्या कारणास्तव स्थगित केला. कामगारांच्या प्रश्नांबाबत दोन्ही ठेकेदारांना उद्या ५ मार्च रोजी नगरपालिकेत बोलावून कामगारांसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. तर दुपारी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कचरा वाहन चालकांचे चार महिन्याचे वेतन उद्या धनादेशाद्वारे देणार असल्याचे तोंडी आश्वासन एका ठेकेदाराने नगराध्यक्ष कांदळगावकर यांना फोनद्वारे दिले. मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन चार महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी दोन दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले. हे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरुच ठेवले होते. थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कामगारांनी मालवण नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. एकीकडे कामगारांना न्याय मिळत नसताना दुसरीकडे संबंधित ठेकेदार एजन्सीने दुसरे पाच कामगार आणून मालवण शहरात कचरा उठाव करण्यास सुरुवात केल्याने संतप्त बनलेल्या कंत्राटी कामगारांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून आज पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र जमावबंदी लागू असल्याने हे उपोषण कामगारांनी स्थगित केले. कामगारांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा दरम्यान कंत्राटी कामगारांनी छेडलेल्या कामबंद आंदोलनाला मालवण तालुका मनसेने पाठिंबा दिला. यावेळी नगरपालिका आवारात मनसेचे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपुरकर, सचिव विल्सन गिरकर, उदय गावडे, विजय पेडणेकर यांनी कामगारांची भेट घेत त्यांची व्यथा जाणून घेतली. तसेच मुख्याधिकारी यांची भेट घेऊन चार महिने पगार नसल्याने कामगारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रशासकीय पातळीवर शक्य ते प्रयत्न करावे आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली. यावर मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला नगरपालिकेने बिल अदा केलेले आहे, कामगारांना पगार न मिळणे हा कामगार व ठेकेदार यांच्यातील वाद आहे. शहरात कचरा उचल होणे नगरपालिकेच्या दृष्टीने महत्वाचे असून कामगारांनी चुकीच्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे असे सांगितले. तरीही याप्रश्नी संबंधित दोन्ही ठेकेदारांनी उद्या ५ मार्च रोजी नगरपालिकेत बोलावून बैठक घेण्यात येणार आहे, नगरपालिकेने बोलावूनही ठेकेदार न आल्यास त्यांच्यावर फौजदारीही प्रशासन दाखल करू शकते असेही मुख्याधिकारी यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत दुपारी नगरपालिका सभागृहात माजी नगराध्यक्ष सुदेश यांच्या सूचनेवरून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व नगरसेवक यांच्या समवेत कामगारांची बैठक घेण्यात आली. यावेळी सुदेश आचरेकर यांनी कंत्राटी कामगारांनी कोरोना काळात प्रामाणिक सेवा दिली असून गेले तीन चार महिने वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे नगरपालिकेने याप्रश्नी लक्ष घालून वेतन मिळवून द्यावे असे सांगितले. तर आपा लुडबे यांनी नगरपालिकेने कामगारांच्या पाठीशी राहिले पाहिजे असे सांगितले. तर मंदार केणी यांनी कामगारांनी थेट कामबंद आंदोलन छेडण्यापूर्वी प्रथम लोकप्रतिनिधींशी याबाबत चर्चा करणे गरजेचे होते असे सांगितले. तर दीपक पाटकर यांनी ठेकेदार वेतन देत नसताना या विषयात नगरसेवक नाहक भरडले जात आहेत असे सांगितले. तर नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी कामगारांनी नगरपालिके समोर आंदोलन करण्यापेक्षा ठेकेदारांच्या घरासमोर आंदोलन केले पाहिजे होते. नगरपालिकेने ठेकेदारांची बिले दिली असतानाही नगरपालिकेची नाहक बदनामी होत आहे. कामगारांनी नगराध्यक्ष म्हणून प्रथम आपल्याकडे प्रश्न मांडले नाही, या सर्व विषयात राजकारणही होत आहे असे सांगत नाराजी व्यक्त केली. तसेच ठेकेदार वेतन देत नसल्याने कामगारांनी कायदेशीर लढा देऊन ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असेही नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले. यावेळी कचरा वाहन चालकांच्या ठेकेदाराशी सुदेश आचरेकर व नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी फोनद्वारे संपर्क साधून कामगारांचे वेतन देत नसल्याबाबत खडे बोल सुनावले. यावेळी संबंधित ठेकेदाराने उद्या ५ रोजी नगरपालिकेत येऊन वाहन चालकांच्या थकीत चार महिन्याचे वेतन धनादेशाद्वारे देऊ, असे आश्वासन नगराध्यक्षांना दिले. उद्या दोन्ही ठेकेदारांशी बैठकीत चर्चा करण्यात ये