You are currently viewing जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे…

जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे…

– जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील नागरिकांनी कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचे आज जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेश द्वारावर उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

       यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी रियास बाबू आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

       कोरोनाची दुसरी लाट राज्यात आली असल्याचे तज्ज्ञ सांगत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाल्या की, नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतराचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे खबरदारी महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

       यावेळी शाहीर कल्पना माळी यांनी कोरोना, लसीकरण व आत्मनिर्भर भारत याविषयावरील कार्यक्रम सादर केला.

       माहिती व प्रसारण मंत्रालय, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पुणे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये चित्ररथ व लोक कलाकारांच्या माध्यमातून लोकांमध्ये कोविड – 19 लसीकरणाबाबतची माहिती, कोविड विषयक नियम, लसीकरणाविषयी लोकांमध्ये असलेले गैरसमज व अफवांबाबत जागृती करणे आणि आत्मनिर्भर भारताच्या उभाराणीसाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 10 दिवस या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

       यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढवला, तर अध्यक्षा समिधा नाईक यांनी फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून मोहिमेचा शुभारंभ केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा