You are currently viewing कुस्ती खेळातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर ही उज्ज्वल करा : बापुसाहेब बंड

कुस्ती खेळातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर ही उज्ज्वल करा : बापुसाहेब बंड

कासार्डे येथे जिल्हास्तरीय प्रौढ गट पुरुष व महिला कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन

 

तळेरे : प्रतिनिधी

 

आपल्या महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडा खेळ म्हणजे कुस्ती होय, या खेळाला फार मोठा इतिहास आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्लांनी(कुस्तीपट्टूनी) राज्यस्तरावरही या खेळाचे उत्तम प्रदर्शन करीत जिल्हाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन कासार्डे विकास मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेब बंड यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्येतेने व सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्यावतीने कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या नाट्यगृहात आयोजित प्रौढगट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बापुसाहेब बंड बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे शिक्षण संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन तथा सिनियर काॅलेजचे प्राचार्य मधुकर खाडये, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र नारकर, कोल्हापुरचे राष्ट्रीय कुस्ती पंच श्रीकांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेचे सचिव दाजी रेडकर, कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा कासार्डे कुस्ती केंद्राचे प्रशिक्षक दत्तात्रय मारकड, पाटचे जेष्ठ कुस्ती पट्टू सनी रेडकर, नारायण ठाकुर, निलेश फोंडेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कासार्डे माध्यमिक विद्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटना आयोजित प्रौढगट जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करताना बापूसाहेब बंड, मधुकर खाड्ये, राजेंद्र नारकर, दाजी रेडकर, श्रीकांत पाटील, दत्तात्रय मारकड व अन्य मान्यवर छाया : सोनू जाधव

 

दरम्यान शक्तीची, बलाची देवता हनुमानाच्या प्रतिमेला मधुकर खाड्ये यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन व कासार्डे विकास मंडळाचे उपाध्यक्ष बापूसाहेब बंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले.

सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन सचिव दाजी रेडकर यांनी स्वागत केले.

या प्रसंगी प्राचार्य राजेंद्र नारकर यांनी खिलाडूवृत्तीने खेळ करून आपले कौशल्य पणाला लावा व खेळातून आपला शारीरिक विकास साधा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी खेळाडूंना केले.

या स्पर्धेला सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कुडाळ, कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील विविध कुस्तीकेंद्रातील निवडक पुरूष व महिला कुस्तिगिरांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कासार्डेचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर, आभार सचिव दाजी रेडकर यांनी मानले.

या ठिकाणी विजेते ठरलेल्या कुस्तीपट्टूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना संघटनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा