मुंबईः
मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region – MMR) रिक्षा आणि टॅक्सी सेवा आजपासून (सोमवार, १ मार्च २०२१) तीन रुपयांनी महाग झाली. मुंबई मनपा, संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्हा तसेच रायगड जिल्ह्याचा मर्यादीत भाग या ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली. आधी रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये होते ते आता २१ रुपये झाले तर टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपये होते ते आता २५ रुपये झाले.
रिक्षा, टॅक्सी आणि कूल कॅब यांचे नवे भाडेपत्रक
मुंबईत सोमवारी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली.
एमएमआरटीएच्या या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी सेवेच्या दरांचा आढावा घेण्यात आला. यानंतर भाडेवाढ जाहीर करण्यात आली. ही भाडेवाढ १ मार्चपासून लागू करण्याचा निर्णय बैठकीत झाला. पण यात एक मेख आहे. नव्या भाडेपत्रकानुसार मीटरचे कॅलिब्रेशन (मीटरचे नवे सेटिंग) होईपर्यंत संबंधित रिक्षा अथवा टॅक्सीने जुन्या भाडेपत्रकानुसार भाडे आकारणे बंधनकारक आहे. मीटर कॅलिब्रेशन करुन घेण्याची जबाबदारी संबंधित रिक्षा अथवा टॅक्सीच्या मालकाची आहे.
रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मालकांच्या संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली. इंधनाचे वाढलेले दर, देखभाल आणि विम्यासाठी होणारा खर्च यात झालेली वाढ ही कारणे संघटनांनी भाडेवाढीसाठी पुढे केली. मागील पाच वर्षात भाडेवाढ झालेली नाही, असेही संघटनांनी सांगितले. कोरोना संकटामुळे मागच्या वर्षी लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे एप्रिल २०२० ते जून २०२० या तीन महिन्यांत अनेकांनी एकही दिवस रिक्षा, टॅक्सी चालवली नाही. यामुळे कित्येकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. कोरोना संकटामुळे आरोग्य खर्चात वाढ झाली आहे. या बाबीचाही सहानुभूतीने विचार करण्याची मागणी करण्यात आली. अखेर भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली.
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी सेवेच्या किमान भाड्यामध्ये प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली. भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे २१ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये झाले. कोरोना संकट पुन्हा डोकं वर काढत आहे. महाराष्ट्रात ७७ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत राज्यात रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ जाहीर झाली.
मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९७ रुपये ५७ पैसे आणि डिझेलची किंमत प्रति लिटर ८८ रुपये ६० पैसे आहे. दररोज सकाळी तेल कंपन्या इंधनाचे दर जाहीर करतात. १ फेब्रुवारी २०२१ ते २० फेब्रुवारी २०२१ या कालावधीत मुंबईत इंधनाच्या दरात अनेकदा वाढ झाली. या इंधन दरवाढीपोठापाठ मुंबईकरांवर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
बहुसंख्य रिक्षा, टॅक्सी सीएनजी अथवा ऑटोगॅसवर धावतात.
मुंबई महानगर प्रदेशात बहुसंख्य रिक्षा, टॅक्सी सीएनजी अथवा ऑटोगॅसवर (वाहनांसाठीचा LPG) धावतात. मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो ४७ रुपये ९० पैसे तर ऑटोगॅसची किंमत ३७ रुपये आणि ३० पैसे आहे. ज्या रिक्षा आणि टॅक्सी सीएनजी अथवा ऑटोगॅसवर धावतात त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे फरक पडत नाही. पण रिक्षा, टॅक्सी संघटनेचा भाग असल्यामुळे संबंधित रिक्षा आणि टॅक्सीसाठीही नवे भाडेपत्रक लागू होणार आहे. नव्या भाडेपत्रकामुळे सीएनजी अथवा ऑटोगॅसवर धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या मालकांना पेट्रोल, डिझेलवर वाहन चालवणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आर्थिक लाभ होणार आहे.