मुंबई:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा आयोजित करण्यासाठी शुक्रवारी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल रोजी सुरू होतील आणि त्या 20 मे पर्यंत चालणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेची सुरुवात 23 एप्रिलला होणार असून ही परीक्षा 21 मेपर्यंत चालणार आहे.
या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकाचे नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने दोन आठवड्यापूर्वी दहावी बारावीच्या परीक्षेचे एक संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते.
या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. यावर पालक विद्यार्थी शिक्षक आणि शाळांच्या काही सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले असून यामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याची माहिती सविस्तरपणे दिली जाईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले. शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेले दहावी बारावीचे वेळापत्रक हे मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
दक्षिण भारतातील काही राज्यांनी कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन नववी, दहावी आदी वर्गांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कोरोना पुन्हा वाढत आहे. ऑनलाईन शिक्षणातून असंख्य विद्यार्थ्यांना आपला अभ्यास पूर्ण करता आला नाही. त्यात एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव कमी होईल याची शाश्वती देता येणार नाही, अशा स्थितीत दहावी बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक अंतिम करण्यात मंडळाकडून घाई करण्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी केला आहे.