*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका प्रिं. सीमा शास्त्री मोडक लिखित अप्रतिम लेख*
*नर्मदे हर—–*
नर्मदे हर —-या उद्घघोषाचा प्रत्यक्ष अनुभव आत्ताच दोन एप्रिलला आला आणि नर्मदा मातेच्या सानिध्याने मन प्रसन्न झाले. शाळेतील शिक्षक श्री. शांताराम पाटील सरांनी ते नर्मदा परिक्रमाला जाणार असल्याचे सांगितले. परिक्रमेला एवढी रजा कशी द्यावी हे विचारताच त्यांनी “उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेबाबत” शाळेत सांगितलं. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून संपूर्ण चैत्र महिना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा असते.
खरं तर या परिक्रमेबाबत ऐकलं होतं आणि परिक्रमा करण्याची मनापासून इच्छा होतीच. झालं. ठरलं. शाळेतील आणि कुटुंबातील आम्ही 22 लोक परिक्रमेसाठी सज्ज झालो. परिक्रमेसाठी मानसिक, शारीरिक तयारी करत होतो. उत्साह उसंडून वाहत होता. या परिक्रमेचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त पाण्याची एक बाटली घेऊन आम्ही निघालो.वाटेत खाण्यासाठी बरोबर काही घेतले नाही. फक्त गाडी भाडे घेतले होते.
अखेर परिक्रमेचा दिवस आला. “नर्मदे हर”च्या जल्लोषात आम्ही प्रवासाला सुरुवात केली. गुजरात मधील राजपिपळापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरील रामपुरापासून आमची परिक्रमा सुरू होणार होती. ठरल्या वेळेत आम्ही रामपुरा येथे पोहोचलो. रस्त्यात काही जणांकडे प्लास्टिक पिशव्या दिसल्या. त्यांच्या पिशव्या घेऊन आम्ही त्या मंडळींना आमच्या शाळेतर्फे कापडी पिशव्या दिल्या आणि “पर्यावरण बचावो” चा संदेश देऊन रामपुरा येथील रणछोडदास मंदिरात जाऊन ठाकुरजींचे दर्शन घेतले.
तसेच मैया नर्मदेचे दर्शन घेऊन आम्ही परिक्रमेला सुरुवात केली.
अतिशय उत्साहात संध्याकाळी साडेसात वाजता आमची परिक्रमा सुरू झाली. वाटेत अनेक मंदिरांचे दर्शन घेतले.विशेष म्हणजे भूक लागण्यापूर्वीच रस्त्यात मंदिरांमध्ये, ठिकठिकाणी प्रसाद, महाप्रसाद, फळे, चहा, कॉफी, थंड पाणी यांचं मुबलक आणि उदार अंतःकरणाने भक्तांना वाटप होत होते. संपूर्ण रात्रभर सेवेकरी अत्यंत प्रेमाने प्रसादाचे वाटप करत होते. कुठेही कचरा आढळला नाही. याचं खरंच मनापासून कौतुक वाटत होतं.
जागोजागी गुजरात पोलीस बांधव भक्तांच्या सेवेसाठी तैनात होते. विचारपूस केल्यावर अत्यंत प्रेमाने मधुर वाणीने शंका निरसन करत होते. डॉक्टरांची टीम ,ॲम्बुलन्स यांची सेवा जागोजागी होती. दमलेल्या भक्तांना विश्रांतीसाठी कॉट, खुर्च्या, फॅन, कुलर यांची चोख व्यवस्था होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या रात्री कोणालाही भीती वाटत नव्हती. महिला, तरुणी निसंकोचपणे परिक्रमा करीत होत्या. कुठेही रोड रोमियो, भुरटे चोर दिसले नाहीत.
क्षणोक्षणी पंढरपूरच्या वारीची आठवण देणारी परिक्रमा अतिशय सात्विक परिक्रमा नर्मदा मैयाच्या आशीर्वादाने संपूर्ण झाली. गुजरात सरकारच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे या परिक्रमेस भक्तांचा ओढा वाढलेला दिसतो.
संपूर्ण परिक्रमे मध्ये मला फक्त एक सुचवावेसे वाटले. परिक्रमेच्या परतीच्या वेळी भक्त काही प्रमाणात थकलेले जाणवले. वयस्कर मंडळी, लहान मुलं अक्षरशः सारखे बसत होते. परिक्रमा पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असूनही काही अंशी शारीरिक क्षमता नसल्याचे जाणवले. त्यावेळी त्यांना पाहून गुजरात सरकारने अशा भक्तांसाठी एखाद्या किंवा दोन वाहनांची सोय करावी असे मला वाटले. अर्थात दुचाकी वाहन असल्यास उत्तम होईल.कारण काही ठिकाणी चार चाकी वाहन जाऊ शकणार नाही. त्यामुळे शक्यतो अशी सोय करावी असे वाटले. खरंतर शक्यतो परिक्रमेसाठी आलेले भक्त चालतच जातात पण अगदी क्वचित, अत्यावश्यक वेळी एखाद्या भक्तास गरज भासलीच तर असे एखादी दुचाकी वाहन असावे. त्याचा संपर्क नंबर सोशल मीडियावर दिल्यास किंवा परिक्रमे दरम्यान रस्त्यावर लावल्यास क्वचित गरज भासणार्या भक्तास खूप सोयीचे होईल मला वाटते. या सुविधेचा फायदा फक्त एखादाच गरजू भक्त घेईन. पण त्यामुळे त्याची परिक्रमा पूर्ण होण्यास मदत होईल. यामुळे त्याची परिक्रमा ही पूर्ण होईल आणि मैया नर्मदा सेवेकरी आणि भक्ताला दोघांना भरभरून आशीर्वाद देईल.
बघा पटतंय का तुम्हाला?
सौ.सीमा श्रीराम शास्त्री मोडक
मुख्याध्यापक
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार
