*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती..
प्रचंड बुद्धिमत्ता असलेले,समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अश्या कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या… आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची घातले.
तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र त्यांनी दिला. असामान्य कर्तृत्व गाजवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.. ते नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीचीही जोड दिली… त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हाच बाबासाहेबांच्या विचारांचा आणि आचरणाचाही पाया होता..
तत्त्वज्ञानाचा पाया पक्का असेल तर आपल्याला प्रगतीची मोठी उडी घेता येते हे बाबासाहेबांना पक्के ठाऊक होते… त्यांनी सर्व धर्माचा व्यवस्थित अभ्यास केला आणि मगच त्यांनी
जाणीवपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला…
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली… बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली नागपूर येथे भरलेल्या परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या आणि त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजीवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितांसाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधीही जोरदार लढा दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले.. त्यांचा प्रत्येक ग्रंथ अतिशय मौलिक आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, तात्त्विक, सांविधानिक, इतिहास, संशोधन, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत वाड्.मयीनदृष्ट्या प्रकाश टाकणारे तसेच दिशादर्शक ग्रंथलेखन केले आहे. हे लेखन प्रेरक चेतनादायी ठरते.. तसेच हे ग्रंथ समाजशास्त्रीय
धर्मशास्त्रीय चिकित्सा करणारे नी आव्हान देणारे सुद्धा आहे. ..डॉ. आंबेडकरांची ग्रंथनिर्मिती म्हणजेच एक सोनेरी पान…
बाबासाहेब आंबेडकरांनी “‘बुद्ध आणि त्यांचा धम्म”’ हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. ‘”जिवो जीवस्य जीवनम’ हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. अंधारात चाचपडणाऱ्या माणसांना डोळस बनविणारा हा ग्रंथ..
बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा चार भागांमध्ये विस्तार केला आहे. एक बुद्धांनी प्रव्रज्या का घेतली ? दोन चार आर्यसत्ये, तीन आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म आणि चार भिक्खू..
या ग्रंथात तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती आणि काव्यमयतेचे अनोखे दर्शन आपल्याला होते..
दूरदृष्टी ठेऊन काम करणाऱ्या आंबेडकरांनी देशातील प्रत्येक भारतीयांच्या कल्याणासाठी कार्य केलेले आहे . सोबतच समता, बंधुता आणि न्यायावर एकसंघ राष्ट्र निर्माणसाठी त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून खूप मोठे योगदान दिलेले आहे.
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
