सिंधुदुर्गनगरी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोवीडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात 505 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात 24 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 4 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला असून, पोलिसांनी 387 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 82 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर नगर पालिका क्षेत्रामध्ये 59 व्यक्ती विनामास्क आढळून आल्या असून त्यांच्याकडून एकूण 12 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये 18 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून 3 हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही 1 लाख 6 हजार 300 रुपये इतकी आहे.
त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण 357 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 4 ठिकाणी कोवीडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरीकांनी कोवीडच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.