श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा…
१३, १४ एप्रिलला उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…
मालवण
मेढा-मालवण येथील श्रद्धास्थान असलेल्या श्री काळबादेवी मंदिराचा १२ वा वर्धापन दिन सोहळा १३ व १४ एप्रिलला मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक विधी, भजन, महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
१३ एप्रिल मला उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत धार्मिक विधी व ‘त्रिशक्ती याग होम हवन’ पार पडणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ (कांदळगाव देऊळवाडी) यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. यामध्ये बुवा राजेंद्र दिनकर कोदे हे भजन सादर करतील, तर त्यांना बंटी कांदळगावकर (मृदंग) आणि दत्ताराम डिंकावलकर (तबला) साथ देतील. रात्री ८ वाजता शंकर मंदिर मेढा मालवण महिला मंडळ प्रस्तुत ‘रंगमेळा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल.
१४ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत सत्यनारायण महापूजा होईल, त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता ‘अष्टपैलू कलानिकेतन’ यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होणार असून, गायक सुनील परुळेकर आपली कला सादर करतील. उत्सवाची सांगता रात्री ८ वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ (म्हापण, वेंगुर्ला) यांच्या पौराणिक दशावतारी नाटकाने होईल.
या सर्व मंगल सोहळ्यास भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळ, मेढा, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
