You are currently viewing समिल जळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

समिल जळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या माध्यमातून गोवा अधिवेशनात घुमणार डिजिटल पत्रकारांचा आवाज – सीताराम गावडे

“दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू” – समिल जळवी

सावंतवाडी :

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांनी ही घोषणा केली.

ही निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य संघटक सीताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक, जिल्हाध्यक्ष भरत केसरकर तसेच जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून करण्यात आली.

या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आबा खवणेकर, सावंतवाडी तालुका सचिव सिद्धेश पुरलकर, प्रसिद्धी प्रमुख साबाजी परब, सदस्य शुभम सावंत, श्रीरंग सावंत, नितीन गावडे यांच्यासह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.

डिजिटल तंत्रज्ञानातील अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख असलेल्या समिल जळवी यांच्याकडे या निमित्ताने महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीनंतर बोलताना समिल जळवी म्हणाले, “संघटनेने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. आगामी काळात संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार प्रामाणिक व निष्ठेने काम करून संघटनेला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेन.”

यावेळी सीताराम गावडे यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करताना पत्रकारांच्या न्याय हक्कांसोबतच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी संघटना प्रभावीपणे कार्यरत असल्याचे सांगितले. तसेच गोवा अधिवेशनात डिजिटल पत्रकारांचा आवाज अधिक प्रभावीपणे घुमेल, असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, नव्या कार्यकारिणीकडून डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटना मजबूत करणे आणि पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, राज्य सचिव तेजस राऊत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी समिल जळवी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा