*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वेदनेचे रंग गहिरे*
आठवांचे वादळ साचले हृदयात
वेदनेचे रंग गहिरे दाटले मनात
स्वप्नांचे दीप शांतपणे विझताना
अश्रूंचे थेंब अलगद ओघळतात…..१
तिमिरात दिसते वेदनेची छाया
हरवल्या आठवांच्या पाऊलवाटा
गेले सारे क्षण निसटून
मनपटलावर स्मृतींच्या लाटा…..२..
पापणकाठ हळूच ओलावले
मनी गहिऱ्या दाटल्या वेदना
स्मृतींच्या लहरी अंतरी तरंगल्या
श्वासांच्या तालात झिरपे संवेदना…..३
दुःखाचा मेघ अलगद कोसळला
एकांताचा दीप थरथरला दारी
स्वर झाला मग मुका आतला
घाव उमटला खोलवर उरी…..४
वेदनेतून उमटे नवजीवनाचा श्वास
दुःखातून मिळतो मनाला विश्वास
अंधार सरता उजळतो प्रकाश
मन पुन्हा धरते जगण्याची आस….५
©️®️ डॉ सौ. मानसी पाटील
