*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा. सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*इतिहासाच्या खाणाखुणा*
शीर्षक -इतिहासाच्या खाणाखुणा
द्विपदी काव्यरचना
जिजाऊंच्या संस्कारातून घडला साक्षात शिवबा
याच मातीच्या कणाकणात दडला अस्मितेचा गाभा….
सह्याद्रीच्या छाताडावर कोरली धगधगती गाथा
त्याच्या पावन पाषाणावरी नतमस्तक होतो माथा…..
गडकोटांच्या कातळातून उमटती अजूनही स्मृती
महाराष्ट्राच्या गर्जनेतून घुमती पराक्रमाच्या श्रुती….
पावनखिंडाचा तो पाषाण अजूनही रक्ताने ओला
पराक्रमाच्या पाऊल खुणांनी हा देश आमुचा सजला….
प्रतापगडाच्या बुरुजावरती शत्रूचा तो गर्व गाढला
स्वाभिमानाचा बुलंद झेंडा याच मातीत रुजला….
l
तळपत्या तलवारीने सीमा आमुच्या राखल्या
खाणाखुणा या शौर्याच्या जागोजागी पाहिल्या….
पैठणीचा तो जरीकाठ अन् लेणी ही कोरीव
कलेमधुनी उमटती इथे संस्कृतीची जाणीव….
विठ्ठलाच्या टाळामधुनी संस्कृतीचा तो छंद
इतिहासाच्या पानापानात सावळ्याचा आनंद……
रायगडाचा दुर्ग बोलतो राज्याभिषेकी थाट
स्वराज्याच्या वणव्यातून उजळली मराठी वाट….
साक्ष देई हा काळा दगड संघर्षाच्या त्या क्रांतीची
जपून ठेवा हीच शिदोरी महाराष्ट्राच्या मातीची……
सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
