You are currently viewing सामाजिक बांधिलकी
Oplus_16908288

सामाजिक बांधिलकी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*सामाजिक बांधिलकी..*

सामाजिक बांधिलकी

काहीलोक म्हणतील..” हे कुठल्या झाडावरच

फळ आहे हो ?” इतके ते या विषयाशी अनभिज्ञ

असतात. कारण त्यांची बांधिलकी फक्त”मी”

पुरतीच असते. मी, मग माझे कुटुंब.. बस्स! या

पलिकडे त्यांना काही देणेघेणे नसते. सरकारी

योजनांचा लाभ घेण्यात मात्र ते एकदम वाकबगार असतात. अग्रेसर असतात.

 

मी, माझे कुटुंब, माझा समाज( मी ज्यात राहतो

तो), माझा गांव व मग माझा देश.. या क्रमाने जरी

तुम्ही निष्ठा ठेवली तरी ती देशसेवा पर्यायाने समाजसेवा म्हणजेच “ सामाजिक बांधिलकी

ठरते. उदा. तुम्ही तुमच्या कुटुंबाची प्रगती केली.

चांगले काम केले. नाव कमविले. जे काम केले

ते समाजासाठी, पर्यायाने देशासाठीच झाले ना?

तुमच्या नावलौकिका बरोबर देशाचाही लौकिक

वाढतो. उदा. आपले खेळाडू. वैज्ञानिक इ.

 

उदा. आपले संशोधक. रात्रंदिवस खपून, अफाट

त्याग करून संशोधन करतात. शोधनिबंध लिहितात. ते विविध देशात पब्लिश करतात. त्यांच्या वैयक्तिक प्रगती बरोबर ते देशाचेही

नाव उज्वल करतात. पर्यायाने स्वत:बरोबर ते

समाजाशी व देशाशीही बांधिल असतात. आपल्या समाजाप्रती, देशाप्रती असलेले आपले

कर्तव्याचे भान म्हणजे” सामाजिक बांधिलकी”.

या बांधिलकीतून तुमची समाजाविषयी व देशा

विषयी निष्ठा प्रकट झाली पाहिजे. मी या समाजाचे, देशाचे काही देणे लागतो हे तुमच्या

कृतीतून दिसले पाहिजे.

 

ही सामाजिक बांधिलकी बाहेरून लादता येत

नाही. तर मुळातच त्या व्यक्तिच्या अंगातच ती

असावी लागते. मनात समाज व देशाप्रती तळमळ

असावी लागते. उदा. घरादारावर निखारा ठेऊन

कीर्तनातून लोकांची मने साफ करायची व दिवसा लोकांची अंगणे, बागा साफ करून हातावरच मिळेल तेवढी भाकरी झाडाखाली बसून खायची याचे काही गाडगे बाबांनी ट्रेनिंग

घेतले होते काय? की त्यांना त्याचा घसघशीत

पगार मिळत होता? अहो, भरपूर पगार खाऊन

काम न करणारे आम्ही कुठे नि लोकसेवेचे व्रत

बाळगणारे गाडगे बाबा कुठे?

 

फाटक्या गोणीत लाखो रूपये देणग्या बाळगणारे

गाडगे महाराज महाराष्ट्रभर धर्मशाळा बांधून गरिबांची सोय करतात, यात्रेकरूंची सोय करतात, मंदिरात अन्नछत्र चालवतात, त्यांना

अशी कुठली प्रेरणा होती की समाजोपयोगी अफाट कामे त्यांनी करावी? त्यासाठी लागते

समाजाप्रती प्रेम राष्ट्रनिष्ठा! ही निष्ठाच माणसाला काम करायला भाग पाडते. आणि ती

रक्तातच असावी लागते, बाहेरून आयात करता

येत नाही.तीच निष्ठा तुकडोजी महाराजांची होती

व अहिल्याबाई होळकरांचीही होती म्हणून खाजगीच्या खर्चातून त्यांनी काशीविश्वेश्वरासह

देशभरातील अनेक देवळांचा जिर्णोद्धार तर केलाच पण शेकडो धर्मशाळा, घाट, पूल, रस्तेही

बांधून कडेने शेकडो झाडेही लावली जी त्यांच्या

कार्याची साक्ष देत आजही उभी आहेत. चांदवडचा राजवाडा व नाशिकचे घाटही दिमाखाने उभे आहेत.

 

भारतातील अनेक राजांनीही

अशी नामांकित कामे केली. त्यात बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांचे नाव व कोल्हापूरकर शाहू महाराजांचे नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल. सयाजीराव द्रष्टे राजे होते. अनेक

लोकहितवादी योजना, शिक्षणासह त्यांनी अंमलात आणल्या. बडोदे शहर आजही त्याच्या खाणाखुणा आभुषणांप्रमाणे आपल्या अंगाखांद्यावर मिरवित आहे.राजर्षी शाहू महाराज

एकदा युरोप दौऱ्यावर गेले असता त्यांनी तिथे काही धरणे पाहिली नि भारतात परतल्याबरोबर

राधानगरी धरणाचे काम तातडीने सुरू झाले जे

आजही शेकडो एकर जमीन भिजवते आहे. याला

म्हणतात सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा!

माझ्या शेतकरी बांधवांसाठी मी कायकाय करू

असे त्यांना होत असे.

 

एकदा एका खेड्यात भरलेल्या बाजारात कोल्हापूरची खेडूत म्हातारी बाजारला आली व

तिची गाडी निघून गेली. त्याचवेळी शाहू महाराजांची अलिशान कार म्हातारीला भर वेगात

जवळून जातांना दिसली व म्हातारीने गाडीला हात दिला. भर्रकन पुढे गेलेली कार मागे आली व

म्हातारी त्यात बसली व म्हणाली, “ पुता, तुला मी

घरापर्यंत दोन आणे भाडं देईन. महाराज काही बोलले नाहीत. बरं बरं.. म्हणत गाडी निघाली व

कोल्हापुरात पोहोचली. म्हातारीने दोन आणे भाडं

महाराजांना दिलं व राजांनी आनंदाने ते घेतलं कारण म्हातारीला आपली ओळख त्यांना द्यायची

नव्हती. म्हातारी उतरताच व गाडी निघून जाताच आजूबाजूचे लोक चकीत होत म्हातारीला म्हणाले,” म्हातारे, अगं कुनाच्या गाडीतनं आलीस तू?” अगं, आपलं राजं नव्हं का ते?”..

अगं बयो, म्या काय केलंस हे? म्हणत म्हातारी

गाडी गेली त्या रस्त्याकडे पहात राहली व तिने आपले दोन्ही हात कृतज्ञतेने जोडले. याला म्हणतात सामाजिक बांधिलकी, व राष्ट्रनिष्ठा.

ती कितीही फाटकी असली तरी त्यांची प्रजा होती.किती उदा. द्यावीत सामाजिक बांधिलकीची! सावरकर टिळक आगरकर लोकहितवादी चिपळूणकर अशी अनंत नावे आहेत ज्यांनी समाज बांधला व उभा केला. जोतिबा सावित्री यांची तर गोष्टच वेगळी होती.

 

कुटुंबात राहूनही शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवून आपण सामाजिक बांधिलकी जपू शकतो.

अनेक प्रकारे,एकमेकांना मदतीचा हात देऊन,

गरिबांना शिक्षणात मदत करून, आपला गांव,

आपले शहर स्वच्छ ठेवूनही ही बांधिलकी जपता

येते. त्यासाठी सीमेवर जाऊन लढण्याची गरज

नसते. घरात, गावात राहूनही देशसेवा करता येते

फक्त तुमची इच्छा हवी बस्स.. मनलावून शाळेत

शिकवणे ही सुद्धा देशसेवाच नाही का? चला तर

मग समाजसेवेचं कंकण बांधून देशसेवेचं व्रत

घेऊ या.. उद्या नाही हो.. आजच.. आत्ताच..

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा