विनामास्क फिरणाऱ्यांना मोफत मास्कचे वाटप करत दिला कारवाईचा इशारा
नगरपंचायत पथकामार्फत गेले ६ दिवस सुरू आहे सातत्याने कारवाई
कणकवली:
विनामास्क फिरणाऱ्यावर केवळ दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्या पुरते मर्यादित न राहता विद्यार्थी, वयोवृद्ध व गरिबांना मोफत मास्कचे वाटप करत कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी अशा ही गांधीगिरी चे दर्शन घडविले. गेले ६ दिवस कणकवली नगरपंचायत मार्फत कणकवली शहरात विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नगरपंचायत ने यासाठी स्वतंत्र पथकही कार्यरत ठेवले आहे. सातत्याच्या कारवाईमुळे मास्क वापरणाऱ्यांची संख्या एका बाजूला वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला विद्यार्थी किंवा वयोवृद्धांना विनामास्क फिरताना पाहून त्यांच्यामध्ये मास्क वापरण्याबाबत सुरुवातीला जनजागृती करून पुन्हा विना मास्क आढळल्यास कारवाईचा इशारा देत मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विना मास्क फिरताना आढळल्यास पाचशे रुपयांच्या दंड आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्वसामान्य माणसाला ५०० रुपये दंड भरणे डोईजड होत असतानाच नगरपंचायतीच्या पथकाने केलेल्या गांधीगिरी ची चर्चा कणकवली शहरात सुरू आहे. मास्क वापरणे हे नियमाने बंधनकारक असतानाही केवळ दंडात्मक कारवाई ने नाही तर जनजागृती करून मास्क वापराचे फायदे ही नगरपंचायतीच्या पथकाकडून जनतेला पटवून दिले जात आहेत. गेले दोन दिवसात सुमारे १०० हून अधिक मास्कचे मोफत वाटपही करून जनजागृती करण्यात आली. या कारवाईत नगरपंचायतचे कर्मचारी प्रदीप गायकवाड, रवी महाडेश्वर, विनोद जाधव, रमेश कदम, सचिन तांबे हे सहभागी झाले होते.