*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वाचनालय*
वृत्त : वनहरिणी
—————————————
जिर्ण शिर्ण ती जुनी इमारत अजून मजला हाक मारते
तिच्या संगती किती वेचले क्षण भाग्याचे साद घालते.
आनंदाने इथे वाचली ग्रंथ पुस्तके कितीक सुंदर
फुलून आले जीवन सारे त्यांच्या संगे असे वाटते
रंजक गोष्टीं, कविता गाणी, वैचारिकता मनी बाणली
आयुष्याचे संचित सारे इथे मिळाले असे भासते
निळी कोवळी स्वप्ने सारी पुस्तकांतून इथे वाढली
त्या स्वप्नांची गम्मत सारी अजून डोळ्या पुढे नाचते
भिंती खचल्या, रंग उडाला दशा जाहली इमारतीची
कळवळले मन अगतिकतेने गालावरती काय सांडते
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
06.04.2026
