नागरिक-प्रशासन समन्वय अधिक मजबूत; निवेदनांची संख्या घटल्याने समाधानाची भावना
समस्या सुटलेल्या नागरिकांकडून नितेश राणे यांना कृतज्ञतापूर्वक भेट
सिंधुनगरी / प्रतिनिधी :
पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता संवाद कार्यक्रमात यावेळी तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले. पूर्वी १०० ते १५० निवेदने येत असताना यावेळी सुमारे ५० निवेदने प्राप्त झाली. विशेष म्हणजे, तक्रारींपेक्षा विकास कामांशी संबंधित मागण्यांचा सूर अधिक होता.
या संवादातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट झाले. मागील संवाद कार्यक्रमात ज्यांच्या समस्या मार्गी लागल्या होत्या, अशा नागरिकांनी यावेळी उपस्थित राहून पालकमंत्र्यांची भेट घेत आभार व्यक्त केले.
पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या दालनात घेतलेल्या या संवादात नागरिक, शिक्षक, संस्थाचालक, कंत्राटी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवरही उपस्थित होते.
प्राप्त निवेदनांवर तत्काळ कार्यवाही करत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून अनेक प्रश्न मार्गी लावले. शिक्षकांच्या संच मान्यतेचा विषय मंत्रालय स्तरावर निकाली काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या प्रश्नावर नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. याशिवाय अतिक्रमण आणि विविध विकास कामांबाबतची निवेदनेही स्वीकारण्यात आली.
यावेळी सभापती नितेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, सावी लोके, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तसेच शिंदे शिवसेना अध्यक्ष दामू सावंत आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
