You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञ व फिजिशियन पदे भरण्याची मागणी
Oplus_16908288

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भुलतज्ञ व फिजिशियन पदे भरण्याची मागणी

वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी; पाठपुराव्याचे आश्वासन

सावंतवाडी :

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही भुलतज्ञ (अ‍ॅनेस्थेटिस्ट) व फिजिशियन नसल्यामुळे रुग्णांना तातडीची सेवा देण्यात अडचणी निर्माण होत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे केली.

यावेळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी “यासंदर्भात प्रस्ताव सादर करा, वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून रिक्त पदे भरण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू,” असे आश्वासन दिले.

लिफ्ट उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सौ. भोसले यांचा सावंतवाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. डॉ. ऐवळे यांनी रुग्णालयात नियमित स्वच्छता होण्याची गरज अधोरेखित करत परिसर स्वच्छतेसाठी नगरपालिकेने सहकार्य करावे, अशी मागणी केली.

तसेच शवविच्छेदन कक्षात पाण्याची कमतरता असल्यामुळे साफसफाई करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही त्यांनी मागणी केली.

डॉ. ऐवळे यांनी सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी जीव तोडून सेवा देत असले तरी भुलतज्ञ व फिजिशियन उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना अन्यत्र हलवावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करता न येणे ही गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे ही दोन्ही महत्त्वाची पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या सर्व बाबींवर पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा