मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप : प्रधान सचिव, वनविभाग आणि हरित लवादाकडे करणार तक्रार
कणकवली
कासार्डे आणि वैभववाडी तालुक्यातील गावांत सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अवैध सिलिका वाळू उत्खनन करत आहेत. हे उत्खनन इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात सुरू असून याविरोधात आम्ही प्रधान सचिव, वनविभाग आणि हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली. अवैध सिलिका उत्खनन करून कर बुडवणाऱ्यांविरोधात अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यावर त्या अधिकाऱ्यांविरोधात बदलीची कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. भाजपाच्या जेष्ठ खासदाराने सिलिका मायनिंगवर कारवाईचे आदेश दिल्याबद्दल कॅबिनेट मंत्र्याला खडसावले असता त्या कॅबिनेट मंत्र्याने अक्षरशः त्यांच्यासमोर लोटांगण घालत तुम्ही मला माझ्या वडिलांच्या म्हणजेच अण्णांच्या जागी आहात असा लाळघोटेपणा केला.
20 फेब्रुवारी रोजी अवैध सिलिका वाहतूक करणाऱ्या 3 गाड्या रात्री साडे दहा वाजता फोंडा रोडला महसूल अधिकाऱ्यांनी पकडल्या. गाडी क्रमांक एम एच 07 एस 9034 , एम एच – एफ 9034 , एम एच – ए एच 9034 ह्या गाड्या सोडण्यासंदर्भात कॅबिनेट मंत्री रात्री 12 वाजता शासकीय अधिकाऱ्यांना फोन करून त्या गाड्या सोडायला सांगतात आणि सर्व अवैध सिलिका वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या सोडल्या जातात. ज्या शिवसैनिकांनी स्वतःचे रक्त सांडले त्यांच्या निष्ठेवर हे कॅबिनेट मंत्री पाणी फिरवत असल्याची टीका उपरकर यांनी केली. अवैध मायनिंग ला सत्ताधारी पाठीशी घालत असून शासनाचा महसूल बुडवत असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. अवैध उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणचे गुगल मॅप घेऊन हरित लवादाकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची माहिती उपरकर यांनी दिली. जे शासकीय अधिकारी या अवैध उत्खननाकडे डोळेझाक करत आहेत त्यांच्यावरही कारवाईची मागणी आपण करणार असल्याचे उपरकर म्हणाले.