पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून ७०.४२ कोटींची वसुली; पाच वर्षांतील सर्वोच्च आकडा
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सूक्ष्म नियोजन करून ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.
जिल्ह्यातील ०८५३ या लेखाशिर्षांतर्गत ‘ब’ पत्रकासाठी शासनाकडून ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महसूल विभागाने प्रभावी नियोजन करत आतापर्यंत ७०.४२ कोटी रुपयांची वसुली केली असून उद्दिष्ट १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे.
तसेच ००२९ जमीन महसूल या लेखाशिर्षांतर्गत ‘अ’ पत्रकात सुमारे ११.३६ कोटी रुपयांची वसुली करण्यात येत गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काटेकोर व अचूक नियोजनामुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे.
विशेष म्हणजे, मा. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्यामुळे यावर्षी वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. तसेच शासनाकडून अतिरिक्त करमाफी देण्यात आली असतानाही महसूल विभागाने विक्रमी वसुली करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
