*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा प्रा सुनंदा पाटील “गझलनंदा” लिखित अप्रतिम गझल*
*वसंत तोवर भरात आला*
मावळतीचा रंग घेउनी चंद्र फिकटसा ढगात आला
दारावरच्या फटीत लपुनी उजेड थोडा घरात आला
तानपुऱ्याच्या तुटल्या तारा तबल्यावरची शाई फुटली
बागेश्रीचा सूर लावता खिन्न जोगिया स्वरात आला
उत्तर शोधत फिरले होते उघडे नव्हते कवाड कुठले
आयुष्याच्या सायंकाळी प्रश्नच केवळ पुढ्यात आला
लिहिला होता दारावरती मी दुःखाचा गूढ तराणा
बघून गेले परत सोयरे मित्र एकटा घरात आला
कळ्या फुलांनी जखमा केल्या कधी न रुतला पायी काटा
कोण आपले परके कुठले, प्रश्न नव्याने मनात आला
अता ठरवले गाणे विसरू साथ स्वरांची उरली नाही
कालिंदीच्या काठावरचा सूर सावळा गळ्यात आला
झाली होती शिशिर पानगळ फांदी म्हणते झाडच थकले
वेचत बसले पिकली पाने वसंत तोवर भरात आला
*गझलनंदा*
