*स्काऊट-गाईड शिक्षणातून घडते संस्कारमय, सर्वांगीण व्यक्तिमत्व! – जे. डी. पाटील
*विलवडे नं. २ शाळेत कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग*
*बांदा*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विलवडे नं. २ येथे स्काऊट-गाईड उपक्रमांतर्गत कब-बुलबुल पथकातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन वर्ग अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला
या मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईडची शपथ, नियम आणि तत्त्वांची ओळख करून देताना “दररोज एक चांगले काम” ही मूल्यप्रधान भावना त्यांच्या मनात रुजवण्यात आली. प्रामाणिकपणा, शिस्त, स्वावलंबन, सहकार्य आणि देशप्रेम यांसारख्या जीवनमूल्यांचे बीज त्यांच्या अंतःकरणात पेरले गेले. तसेच स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि समाजाप्रती कर्तव्यभावना यांचे महत्त्वही प्रभावीपणे पटवून देण्यात आले.
खेळ, गाणी, कृतीप्रधान उपक्रम आणि गटकार्याच्या माध्यमातून शिक्षण अधिक आनंददायी व जिवंत करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थी या उपक्रमात मनापासून सहभागी होत होता. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद आणि उत्साह हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होता. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि नेतृत्वगुणांची सुंदर जडणघडण होत असल्याचे स्पष्टपणे जाणवले.
यावेळी राज्य आदर्श शिक्षक तथा घारपी शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. डी. पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले,
“स्काऊट-गाईड हे केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे संस्कारस्थान आहे. येथे मिळणारे मूल्य शिक्षण त्यांच्या आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरते आणि खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवते.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुरेश काळे व उपशिक्षिका प्रमिला ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, अंगणवाडी सेविका सायली दळवी, मदतनीस मनाली दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल सावंत, उपाध्यक्षा विशाखा दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सरपंच प्रकाश दळवी तसेच उपस्थित पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
