*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभाताई पिटके लिखित अप्रतिम बोल*
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडीचे अध्यक्ष, सन्माननीय श्री दीपक पटेकर ह्यांच्या “बकुळीची फुले” ह्या पहिल्या काव्यसंग्रहाचे आज रविवार दि २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सावंतवाडी येथील कविवर्य केशवसुत कट्ट्यावर मोठया दिमाखात प्रकाशन होणार आहे.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.एच. व्ही. देशपांडे( माजी प्राचार्य आजरा महाविद्यालय तथा शिवाजी विद्यापीठ माजी सिनेट सदस्य) हे असून अध्यक्ष स्थानी मालवणी साहित्यिक आदरणीय विनयजी सौदागर हे आहेत. ह्या कार्यक्रमाला प्रा. डॉ.जी. ए. बुवा, साहित्यिका सौ.उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आदींची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे.
श्री दीपक पटेकरांचा हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. त्यामुळे ह्या समारंभाचे विशेष कौतुक आहे कारण, प्रत्येक पहिल्याचे कुतुहुल ,आनंद वेगळाच असतो. पहिले अपत्य ,पहिली भेट किंवा पहिला पगार आणि अशा बऱ्याच घटना ज्या पहिल्यांदाच घडत असतात त्याविषयी असणारी हुरहुर वेगळीच असते, भावना वेगळ्याच असतात. अशा दृष्टीने होणारा हा सोहळा पटेकरांचा दृष्टीने निश्चितच खास आहे. बकुळीची फुले ह्या नावातच पटेकरांचा पुस्तकाविषयी असलेल्या भावनांचा सुगंध भरलेला आहे. त्यांच्या मनाची कोमलता आहे ह्या बकुळ फुलांनी रसिक मनाला भुरळ घालावी अशी कवींची भावना नक्कीच असणार कारण, पटेकरांचे शब्दावरील प्रभुत्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते उत्तम कवी तर आहेतच परंतु अभ्यासू गझलकार हीआहेत. कविता कशी असावी ह्याची जाण असणारे असून अनेक स्पर्धांचे त्यांनी आजवर अनेक वेळा परीक्षण केलेले आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कवितासंग्रहासाठी निवडलेली प्रत्येक कविता शबरीच्या बोराप्रमाणे मधुर रसाळ असणारच म्हणूनच या भावनाप्रधान कवीच्या काव्यसंग्रह प्रकाशन समारंभाला वेगळे महत्व आलेले आहे. ह्या बकुळीच्या फुलांना आशीर्वाद देण्यासाठी तेव्हढ्याच तोलामोलाचे पाहुणे जमणार आहेत आपणही कार्यक्रमाला हजर राहून दीपक पटेकराच्या ह्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचे स्वागत करूया. चला तर सावंतवाडीला आज संध्याकाळी ठीक 5.45 ला केशवसुत कट्ट्यावर…
प्रतिभा पिटके
अमरावती
