*दिनांक २८ मार्च रोजी नाशिक येथे सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड यांच्या हस्ते सन्मानित*
*विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारे ध्येयवेडे व्यक्तिमत्व प्रा.डा.नरेशचंद्र काठोळे*
विद्या विनयेन शोभते. असंच एक विनयशील प्रतिभावंत, हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे मिशन आय.ए.एस. चे संस्थापक, शिल्पकार…
दिवसरात्र मिशन आय.ए एस च्या कार्याला संपूर्णपणे वाहून घेतलेले उत्स्फूर्त सेवाभावी बुद्धिवादी व्यक्तीमत्व म्हणजे मिशन आय. ए.एस. अमरावतीचे संचालक श्री. नरेशचंद्र काठोळे
भारतीय शिक्षणाचे लोकशाहीकरण आणि नागरी सेवा क्षेत्रात, प्रभावशाली भाष्य करणारे उत्कृष्ट वक्ते… भारताचे राष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी गौरविलेले डॉ. काठोळे यांचे कार्य म्हणजे ध्येयाधिष्ठीत संस्था बांधणीचा आदर्श नमुनाच आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
दहावी बारावीनंतर काय?? हा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांना भेडसावत असतो. बहुतांश मुले बारावीनंतर इंजिनिअर बनण्याची स्वप्न बघतात.
परंतु कलेक्टर बनण्याचं स्वप्न बघणारी फार कमी मुले असतात. अशा विद्यार्थ्यांना गुरू मार्गदर्शक बनून प्रेरणा देण्याचे काम मार्गदर्शन करण्याचे काम आमचे काठोळेसर अविरत करीत असतात. त्यांच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी सुध्दा त्यांचा उत्साह प्रचंड दांडगा आहे. नेहमी हसतमुख असणारे, काठोळेसर आजकालच्या तरुणांसाठी प्रेरणास्थान आहे. उत्साहाचा खळखळता झरा आहेत. या वयातही त्यांचे अथक परिश्रम, सतत भ्रमंती, आरोग्य आणि आहाराच्या बाबतीत अतिशय जागरूक असणे. आजकालच्या तरूणांना लाजविणारे आहे.
” उम्र को अगर हराना है तो शौक जिंदा रखिए साहाब,
मुर्दा दिल क्या खाक जिया करते है”
असंच त्यांच्याकडे बघून म्हणावसं वाटतं.
गेली सव्वीस वर्षे निस्वार्थपणे संपूर्ण भारतात, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून विद्यार्थी दशेपासूनच मुलांना आय. ए.एस. बनविण्याचे स्वप्न ते दाखवित आहेत.
जिल्ह्याजिल्हयातील शाळांमध्ये जाऊन त्यांना स्वतः मार्गदर्शन करून प्रशासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे ज्ञानाचे धडे देत आहेत. अगदी सहजपणे हसतखेळत ते मुलांमध्ये वावरतात. प्रशासकीय सेवेत मराठी टक्का वाढावा यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. कार्पोरेट क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, शिबिरांमधून विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यांच्याशी थेट संवाद साधतात. मुलांना प्रशासकीय सेवेची स्वप्न दाखवितात. एवढेच नाही तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची कलेक्टर होण्यासाठीची परीक्षा व अभ्यासक्रमाला लागणारी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके आणि अभ्यासिका फक्त एक रूपयात त्यांच्यामार्फत उपलब्ध करून दिली जात आहेत.
“जया अंगी मोठेपण तया यातना कठीण”, चांगल्या कामात अडथळेही खूप येतात. परंतु त्यावरही ते सहजपणे मात करतात. यासाठी व्यासंग लागतो, चिकाटी लागते ती त्यांच्याजवळ निश्चितच आहे. या सर्व कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.विद्याताई पण खूप मदत करीत असतात.आतापर्यंत आदरणीय स्व.सुरेश भट, श्री. विश्वास नांगरे पाटील, प्रा.मधुकर केचे, मिर्झा रफी अहमद बेग, साहित्यिक बबन सराडकर यांच्यासह सर्वश्री विकास खारगे तुकाराम मुंढे एकनाथ डवले श्रीकर परदेशी प्रवीण दराडे रत्नाकर गायकवाड जे पी डांगे पुरुषोत्तम भापकर रवींद्र जाधव विपीन इटनकर सारख्या ३७३ सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यांच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. यातील काही अधिकाऱ्यांनी तर त्यांच्या घरी मुक्कामही केला आहे. त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई हसतमुखाने सगळ्यांचे आदरातिथ्य करतात.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे साहित्य व जागा तसेच ग्रंथालय व अभ्यासिका त्यांनी आपल्या २६ वर्षांपूर्वी आपल्या अमरावती विद्यापीठात जाताना लागणाऱ्या महापौरांच्या बंगल्यासमोरील जिजाऊ नगरातील घरातच उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या घरातच पुस्तकांची मोठी लायब्ररी आहे.
काही माणसे विशिष्ट ध्येयाने पछाडलेली असतात त्यात काठोळेसरांचं समावेश करावा लागेल. त्यासाठी काठोळे सरांनी आपले जीवन वाहून घेतले. लेखन वाचनाचा छंद असलेले, आणि आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील एकूण ७३ पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. परंतु जरा म्हणून गर्व नाही. असं हे हसतमुख व्यक्तीमत्व, विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांचे, प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचे आवाहन करीत, दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान झारखंड मध्य प्रदेश छत्तीसगड जम्मू कश्मीर तामिळनाडू उत्तरप्रदेश व महाराष्ट्रात शिबिरं आयोजित करून स्वतः मार्गदर्शन करीत असतात.
आतापर्यंत २३ राज्यांमधून सुमारे १५००० च्या वर भाषणे त्यांनी स्पर्धा परीक्षेवर दिलेली आहेत. इयत्ता दुसरीपासूनच यु.पी.एस. सी. परीक्षा धोरणापर्यंत सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्यात येतात.कधीकधी मार्गदर्शनासाठी आय.ए.एस अधिकारी यांना पण पाचारण केले जाते. वेगवेगळ्या अभ्यासिकांमधून पण मार्गदर्शनपर व्याख्याने दिली जातात.त्यासाठी कमी खर्चात लायब्ररी,लॅपटाप , टेबल पुस्तके व लागणारे इतर सर्व साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
मिशन आय.ए.एस. २३ राज्यात यासाठी काम करीत आहे. शेवटी शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते.
महाराष्ट्रात नवी मुंबई, ठाणे पुणे, नागपूर, कोल्हापूर, अमरावती वणी अकोला परळी वैजनाथ ब्रह्मपुरी देवरी पुसद येथे मिशन आय ए, एस च्या अभ्यासाचे केंद्र आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना अगदी अल्प दरात अभ्यासिका उपलब्ध करून दिली जाते.
“लहरोसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती”
बुंद बुंदसे बनता है सागर
या उक्तीने ज्ञानार्जन करीत गेल्यास निश्चितपणे प्रशासकीय सेवेत हा टक्का वाढणार आहे. बस त्यासाठी अभ्यासाची जिद्द आणि चिकाटी हवी.आय. ए. एस. होण्याची स्वप्न मुलांनी बघायला हवीत. स्वप्नं जी तुम्हाला झोपूच देत नाही, उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि त्याचा सातत्याने पाठलाग करा.
मग फिनिक्स भरारी घ्यायला वेळ लागणार नाही. असा उपदेश नेहमी आपल्या मार्गदर्शनातून ते देत असतात. त्यांच्या मार्गदर्शनातून आजवर कितीतरी विद्यार्थी घडले आहेत.
संपूर्ण भारतात १५००० च्या वरून कार्यक्रम काठोळे सरांनी घेतले आहेत. अनेक नवीन सनदी अधिकाऱ्यांच्या सत्कार त्यांनी केलेला आहे.
हे सगळं करीत असताना कुठल्याही मानधनाची ते अपेक्षा करीत नाहीत. उलट निशुल्क सेवा देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांच्या या सेवाभावी वृत्तीने अनेक उच्चपदस्थ अधिकारी व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांपासून तर अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्या कार्याशी जुळल्या गेल्या आहेत. वैयक्तिक व सामाजिक जीवनात अतिशय काटेकोरपणे जगणारे काठोळेसर म्हणजे समाजकार्याला वाहिलेले सेवाभावी व्यक्तीमत्व, त्यांच्या या कार्याचा खूपच अभिमान वाटतो.
आतापर्यंत अनेक शैक्षणिक व सामाजिक पुरस्कारानी त्यांना गौरविण्यात आले आहे. याच कार्याची पावती म्हणून पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक व इन्फिनिटी मिडिया पुणे यांच्या सहकार्याने आयोजित ICON OF THE DECADE हा प्रतिष्ठित असा बहुमोल सन्मान २८ मार्च २०२६ सकाळी ११ वाजता नाशिक येथे IBIS HOTEL येथे अपर जिल्हाधिकारी अपर आयुक्त आय,ए,एस अधिकारी आणि प्रमुख पाहुण्या मराठीतील अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला आहे. त्यासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
आपले हे सेवाभावी व्रत असेच अखंडपणे सुरू राहो, आणि आपले उद्दिष्ट सफल होवो. हीच श्रीचरणी प्रार्थना.
“लगेगा जरा वक्त जिंदगी तेरे इम्प्तिहानमे
अभी तो सफर शुरू हुआ है
पल्लवी उमरे
कार्यकारिणी सभासद
मिशन आय.ए.एस.
मुंबई
