कणकवलीत सुशांत दळवी खूनप्रकरणी संताप : मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची ग्रामस्थांची मागणी
कळसुली पंचक्रोशीकडून पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन; सखोल व निष्पक्ष तपासाची अपेक्षा
कणकवली :
बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचा सखोल व निष्पक्ष तपास करून खऱ्या मुख्य आरोपींना अटक करावी, अशी ठाम मागणी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन सादर करण्यात आले.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, २७ मार्च रोजी कणकवली येथे सुशांत दळवी यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली असली, तरी खुनाची पद्धत आणि स्वरूप पाहता हे कृत्य एकट्या व्यक्तीकडून झालेले नसावे, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची शारीरिक स्थिती पाहता त्याच्याकडून एकट्याने हे कृत्य घडणे संशयास्पद असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच, या खूनप्रकरणामागील मुख्य सूत्रधारांनी पोलिसांची दिशाभूल करत दळवी यांच्या परिचयातील व्यक्तीला अडकवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केवळ एका आरोपीवर कारवाई करून तपास संपवणे मान्य नसून, या गुन्ह्याचा संपूर्ण छडा लावून खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
पालकमंत्री म्हणून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात व खूनप्रकरणातील सर्व संबंधितांना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणावर आपण स्वतः लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. “या प्रकरणातील कोणालाही वाचवले जाणार नाही. सुशांत दळवी हे माझे जवळचे मित्र होते. त्यामुळे या प्रकरणात खासदार नारायण राणे यांनीही पोलीस अधीक्षकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मी स्वतःही तपासाची माहिती घेत असून सर्व आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी शीतल दळवी, अतुल दळवी, प्रफुल सुद्रिक, जयवंत गावकर, दिलीप सावंत, सुगंधा दळवी, रुजाय फर्नांडिस, नंदकिशोर परब, स्वप्निल गोसावी, सुशील सावंत, मिलिंद सावंत, मोहित सावंत, प्रथमेश दळवी, शरद सावंत, मारुती दळवी, अमित दळवी, शुभम राऊत, विराज गोसावी, राजा दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
