देवगड तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट; हापूस आंबा-काजू पिकांना मोठा फटका
देवगड :
तालुक्यात गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले. सकाळपासून जाणवणाऱ्या प्रचंड उष्म्यानंतर सायंकाळी झालेल्या या बदलामुळे हापूस आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गुरुवारी सकाळपासूनच तालुक्यात उन्हाचा कडाका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. मात्र सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. नारिंग्रे, मिठबांव, कातवण, तळेबाजार आणि शिरगांव परिसरात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटात जोरदार पाऊस झाला.
अनेक ठिकाणी पावसासोबत मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने परिसरात पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गारांच्या मारामुळे तयार होत असलेल्या हापूस आंब्याला मोठा फटका बसला असून फळांवर डाग पडणे व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या हापूस आंब्याचा हंगाम केवळ १० टक्क्यांवर असताना या अवकाळी पावसाने घाला घातल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
