You are currently viewing ज्याचा त्याचा राम

ज्याचा त्याचा राम

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम स्फूटलेख*

 

*ज्याचा त्याचा राम*

 

*वाचे घेता राम नाम*

*पूर्ण होई सर्व काम*

असे नेहमीच आपण म्हणत असतो. कारण राम म्हणजे विष्णूचा अवतार! त्याला देवत्व आहेच!

आधुनिक वाल्मिकी अशी उपाधी ज्यांना दिली गेली होती त्या गीत रामायण कर्त्या गदिमांनी सुद्धा त्यांच्या एका गीतात,

अंश विष्णूचा राम

धरेची दुहिता ती सीता

अशी शब्दरचना केली आहे.

पृथ्वीवर माजलेल्या राक्षसांचा संहार करण्यासाठी विष्णूने रामाचा हा मानव अवतार घेतला होता. त्यातूनच रामायणाची कथा निष्पन्न झाली.

 

देहधारी श्रीराम आपण पाहू लागलो. राम कसा तर निळा सावळा, अत्यंत तेजस्वी, ज्याला कमल नयन म्हटले जाते. दशरथ कौशल्येचा पुत्र, भरत लक्ष्मण शत्रुघ्न यांचा भ्राता, आणि जानकीचा पती धनुर्धारी श्रीराम!

 

या मनुष्य रुपी रामाचे कोण भक्त नाहीत?

एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नसली किंवा आवडणारी नसली की नकळतपणे आपण म्हणतो, ” अरे राम!” वाटेत जाता येता कोणी भेटले तर मराठी संस्कृतीनुसार आपसूकच मुखावाटे “श्रीराम”किंवा रामराम मंडळी” अशा प्रकारचे उद्गार येतात.

 

एक वचनी, एक पत्नी लोकाभिराम सर्वांनाच वंदनीय असा हा प्रभू श्रीराम! तो माणूस असला तरी प्रत्येकाच्या हृदयातील तो ईश्वर आहे.

 

मलाही प्रभू श्री रामचंद्र यांचा आदर आहे. मीही हेच म्हणेन की, पुत्र असावा तर श्रीरामासारखा, बंधू असावा तर श्रीरामासारखा आणि पती असावा तर? या ठिकाणी मात्र माझी जीभ चाचरते.

 

सीतेला रावणाने माया रूपात पळवून आणल्यानंतर तिचा शोध घेणे, हनुमानाच्या मदतीने तिचा तपास लागल्यावर सेतुबंधन करून लंकेत प्रवेश करणे आणि त्यानंतर अनुपमेय असे युद्ध करून रावणाचा वध करणे इत्यादी सर्व गोष्टी करताना रामाने पती धर्म नक्कीच निभावला. मात्र अयोध्येला परतल्यानंतर तो लोकांचा राजा झाला का? प्रजाहितदक्ष राजाने केवळ एका धोब्याच्या बोलण्यावरून त्याच्या गर्भार पत्नीला, सीतेला लक्ष्मणाला सांगून, तिला कसलीही कल्पना न देता फसवून तिचा त्याग करावा? ही गोष्ट माझ्या मनाला सतत खटकते. रावणाने तिला पळवली तरी ती अशोक वनात राक्षसींभोवती होती. तिला रामाने सोडवून आणल्यानंतर त्या पवित्र सीतेला प्रत्यक्ष अग्नी देवाने सुद्धा स्पर्श केला नव्हता. असे असूनही रामाने सीतेचा त्याग करावा हे मान्य करण्यासारखे नाही.

 

लोकापवाद नको हे जरी खरे असले तरी रामाने नगरजनांना सीतेचे पावित्र्य पटवून देणे गरजेचे होते. नगरवासीयांना ते नक्कीच मान्य झाले असते.ज्या रामाने शिळा झालेल्या अहिल्येचा उद्धार केला त्या रामाने जानकीचा त्याग करावा हे पटत नाही.

 

एक माणूस म्हणून माझ्या मते रामाने त्याच्या आयुष्यात केलेली ही फार मोठी चूक होती.

 

*अरुणा मुल्हेरकर*

*मिशिगन*

प्रतिक्रिया व्यक्त करा