*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*भाषा व इतर विषयही महत्त्वाचे*
हळूहळू शैक्षणिक सत्राची सांगता होत आहे, काही ठिकाणी मार्च मध्येच परीक्षा होऊन आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यांत रिझल्ट लागल्यावर पुन्हा शाळा एक महिन्यासाठी सुरू होतील, तर काही ठिकाणी एप्रिलच्या अखेरपर्यंत वार्षिक परीक्षांचा ओघ सुरू राहील. हे सर्व वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीवर अवलंबून आहे. वर्षभर विद्यार्थीवर्ग आपल्या सहवासांत असतो, दिवसाचा भाग बनून जातो. अभ्यासक्रम संपवून पुनश्च उजळणी घेताना एक प्रकारे मन भरून येते. विशेषतः इयत्ता दहावीचा निरोपसमारंभ हा भावूक क्षण तर शिक्षकांना दरवर्षी अनुभवावा लागतो. पंखात बळ देण्याचे काम या टप्प्यावर झालेले असते. शालेय जीवनांत प्रत्येक विषय महत्वाचा असतो अगदी खेळ सुद्धा, पण आपण सर्वत्र आजकाल पहात आहोत की, चांगले करिअर निवडायचे असेल तर शास्त्र व गणित हे विषय पक्के हवेत यांत शंका नाहीच. पण त्यांवर लक्ष केंद्रित करताना इतर विषयांना साहजिकच दुय्यम स्थान मिळते. खरे तर अध्ययन करताना कोणताच विषय सोपा नसतो, म्हणून तर विद्यार्थी जीवनांत हा सर्व पाया पक्का करण्याची अपेक्षा असते.
मराठी, हिन्दी, इंग्रजी, संस्कृत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय ही वार्षिक परीक्षा गुणांकन-टक्केवारीसाठी महत्वाचे आहेत. सुंदर हस्ताक्षर, आपल्या शब्दांत उत्तरे लिहिण्याची, तयार करण्याची जी मजा आहे त्यांस आजकालचा विद्यार्थीवर्ग मुकला आहे की काय? असा विचार वारंवार मनांत येत रहातो. निबंध कसा आणि किती लिहायचा? मराठी व इतर भाषांतील व्याकरणाचे महत्व जे गेल्या काही पिढ्यांना प्राथमिक शाळेतच माहिती झाले होते ते आजकाल खूप कमी दिसून येते. आधुनिकीकरणासोबत जन्मापासून जोडलेली ही पिढी संगणक आणि भ्रमणध्वनीच्या विश्वांत प्रचंड गुंतलेली आहे. सहज उपलब्ध होणारे माहितीचे स्त्रोत त्यांच्या वैचारिक शोधबुद्धीला अपंगत्व आणतात असे क्षणोक्षणी दिसून येते. संवादाचे माध्यम जी भाषा आहे तिच्यातही प्रचंड सरमिसळ आहे, त्यामुळे प्रश्न असा उपस्थित रहातो की पुढे जाऊन कोणती भाषा? विद्यार्थी/विद्यार्थिनी अस्खलित बोलणार.
वाचन, लेखनाचा सराव त्यांतील सातत्य, बरेच काही देऊन जातो. कार्यपुस्तिका [Work Book] मध्ये प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुद्देसूद मांडणीवर भर देण्याची गरज असते, कारण मुद्दा लक्षांत राहिला की उत्तर आठवायला वेळ लागत नाही. परीक्षकांनाही अंदाज येतो की विद्यार्थ्यांस नक्की सखोल माहिती किती आहे. स्वतःच्या वर्गाचा लागणारा रिझल्ट ही त्या वर्गशिक्षकाची आत्मिक कमाई असते. वर्गाच्या वार्षिक परीक्षा निकालादिवशी, जितकी जास्त टक्केवारी तेवढा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वृद्धिंगत होतो. कधी कधी कोणत्या तरी एकाच विषयाची भिती मनांत असते. त्या विषयाचा अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. तितके दुर्लक्षही होते, परिणाम सर्व विषयांच्या गुणपत्रिकेवरील टक्केवारीत दिसायला लागतो. इयत्ता बारावी नंतर कलाविभाग मध्ये विषय निवडताना, विद्यार्थीवर्गाची अशी समजूत असते की मराठी विषय सोपा आहे, मातृभाषा असल्याने अभ्यास काय येता-जाता होईल. जसे कॉलेज सुरू होते, अभ्यासक्रम पुढे जाऊ लागतो, आणि मराठीची व्याप्ती समोर यायला लागते, तेव्हां संदर्भग्रंथांचे वाचन आणि लेखनटिप्पणी काय असते ते लक्षांत येऊ लागते, विद्यार्थी अक्षरशः अचंबित होतात.
भाषा विषयांत जर पदवीधर, पदव्युत्तर किंवा त्याही पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर रोजच्या तासिका संपल्यावर वाचनालयांत बसून नोंदी करणे हे क्रमप्राप्तच आहे. कोणतीही भाषा किंवा विषय असो चार,पाच पुस्तके समोर ठेवून उत्तरे शोधत स्वतःच्या शब्दांत मांडता येणे हे आव्हान असते, हे झाले पदवीच्या विद्यार्थीवर्गासाठी, आत्ताच्या काळांत पहायला गेले तर प्राथमिक इयत्तांपासून लेखनाचा कंटाळा करणे, इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांना एक-दोन परिच्छेदाचे उत्तर लिहिले की हात दुखायला लागतात. प्रश्नांची अपेक्षित गरज काय आहे हे समजून घेतले जात नाही. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे, “छडी लागे छमछम, विद्या येई घमघम” सध्या याचा वापर करत नसल्याने, कोणत्याच शैक्षणिक टप्प्यावर गंभीरपणा दिसून येत नाही. काल पाठ केललं आज परत पाटी कोरीच असते. वाढती स्पर्धा, करिअरच्या संधी या सगळ्याचा विचार करता सर्व विषयांचे महत्व ध्यानी घेतले पाहिजे. भविष्यांत कधी कोणत्या विषयावर काम करावे लागेल काहीच सांगता येत नाही. प्रत्येकाची बुद्धी आणि कौशल्य यांत विविधता असतेच असते. एकाच घरांत राहणारे लोक वेगवेगळ्या कार्यक्षेत्राशी निगडीत असतात.
भाषेचा उपयोग विविध ठिकाणी करता येतो, बालपणी एखादी भाषा कानावर पडत असेल तर ती अवगत होण्यांस विलंब लागत नाही. निरीक्षणामुळे शब्दरचना, वाक्य यांच्या सहाय्याने संवादाचे काम सोपे होते. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे भाषेचे लेखन-लिपीस्वरूप तयार होण्याआधीपासून ती मौखिक रूपांत आहे. पाठ्यपुस्तकांतील प्रश्नाभ्यास मध्ये आजही मौखिक प्रश्न आधी विचारले जात आहेत, ज्ञानदानाचे पूर्वीच्या काळचे सत्कार्य हे मौखिकतेला प्राधान्य देणारे होते. जसे परकीय भाषांना महत्व दिले जाते, तसे भारतांत अनेक प्रांतीय भाषा आहेत, त्या त्या ठिकाणी स्थायिक होताना मदत करतात. मार्गदर्शक म्हणून हे शब्द नेहमीच मनांत रुंजी घालत असतात…
“मार्ग लाभो पावलांना, ही तृणाची याचना,
लाभू दे ऐसा वसा की, जन्म होवो प्रार्थना.”
खरे तर वर्गातील बेंचपासून सुरवांत झालेला हा प्रवास, व्यासपीठापर्यंत पोहोचण्यासाठी अनंत कष्ट घ्यावे लागतात.
©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
संचालिका : ‘ज्ञानमुद्रा अभ्यासिका’, रत्नागिरी
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
