You are currently viewing जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी शिवसेना-भाजपकडून निवड निश्चित
Oplus_16908288

जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी शिवसेना-भाजपकडून निवड निश्चित

संतोष साटविलकर, रुहिता तांबे, प्रितेश राऊळ आणि अनुराधा महेश नारकर यांना संधी; विकासाला गती देण्यासाठी अनुभवी नेतृत्वावर भर

सिंधुदुर्गनगरी :

जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे.

शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत उपनेते संजय आंग्रे यांनी ओरोस येथे उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले संतोष साटविलकर यांची वित्त व बांधकाम सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच कणकवली तालुक्यातील जानवली मतदारसंघातून निवडून आलेल्या रुहिता तांबे यांची समाजकल्याण सभापती पदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजय पडते, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल आणि गटनेते केशव नारकर, दीपलक्ष्मी पडते, सुदा कवठणकर यांच्यासह शिवसेनेचे इतर जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान भाजपकडूनही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ओरोस येथे उमेदवारांची घोषणा केली. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी मतदारसंघातून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच देवगड तालुक्यातील फणसगाव मतदारसंघातून निवडून आलेल्या अनुराधा महेश नारकर यांची महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

या वेळी भाजपचे गटनेते संजय बोंबडी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, महेश उर्फ बंड्या नारकर, अमोल तेली, तसेच पक्षाचे इतर जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी तसेच विविध विभागांच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अनुभवी लोकप्रतिनिधींना संधी देण्यात आल्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले. या निवडीमुळे मालवण, कणकवली, वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा