कै. किशोर घाडीगावकर स्मृती स्पर्धेत २२ संघांचा सहभाग; इस्तियाक संघाचे वर्चस्व, इस्तियाक ठरला मालिकावीर
मसुरे / प्रतिनिधी :
अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंच, मुंबई आणि मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अधिकारी कै. किशोर घाडीगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भायखळा येथील मुंबई अग्निशमन मुख्यालयात आयोजित राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत मालेगावच्या इस्तियाक संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने आयएससी मालेगाव संघाचा सरळ दोन सेटमध्ये १५–०७, १६–१४ असा पराभव केला.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, रायगड, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे येथील एकूण २२ संघांनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंमुळे स्पर्धा अत्यंत रंगतदार झाली. विजेत्या इस्तियाक संघाकडून इस्तियाक, यासीन व मुबासिर यांनी उत्कृष्ट खेळ केला, तर उपविजेत्या आयएससी मालेगाव संघाकडून वकार याने चांगली झुंज दिली.
उपांत्य फेरीत आयएससी मालेगाव संघाने आमिर काझी यांच्या संजय भोसले प्रतिष्ठान (सोलापूर) संघाचा १५–०६, १५–०६ असा सहज पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात इस्तियाक मालेगाव संघाने सांगली जिल्हा संघावर तीन सेटमध्ये ०६–१५, १५–११, १५–०८ असा विजय मिळवला. या सामन्यात महेश माने आणि संदेश घारे यांनी उल्लेखनीय खेळ केला, मात्र इस्तियाकच्या आक्रमणासमोर त्यांना माघार घ्यावी लागली.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल इस्तियाक (मालेगाव) याला ‘मालिकावीर’ तर संदेश घारे (सांगली) याला ‘बेस्ट शूटर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
उपउपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे :
अमीर काझी सोलापूर विरुद्ध टेंभुर्णी – २१–१४,
इस्तियाक मालेगाव विरुद्ध कल्याण – २१–१०,
आयएससी मालेगाव विरुद्ध मुंबई महानगरपालिका – २१–०६,
सांगली विरुद्ध रायगड (अलिबाग) – २१–१६.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलातील सर्व अधिकारी तसेच अग्निशमन सेवा कला व क्रीडा मंचचे सचिव भगत, स्पर्धा प्रमुख मंगेश भोसले, निरीक्षक व माजी राष्ट्रीय खेळाडू रत्नदीप रावराणे, राष्ट्रीय खेळाडू महेश कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा नियंत्रक प्रफुल्ल वाईरकर, तांत्रिक सल्लागार मिलिंद बिर्जे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व चषकांचे प्रायोजकत्व सुरज चव्हाण यांनी स्वीकारले होते.
स्पर्धेचे उद्घाटन उपप्रमुख अग्निशमन अधिकारी एस. डी. सावंत, सेवानिवृत्त विभाग अधिकारी श्री. पाटील, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे, भगत, केंद्र अधिकारी बोरुले तसेच कै. किशोर घाडीगावकर यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत झाले. नगरसेवक रोहिदास लोखंडे, समीर चव्हाण, दत्तप्रसाद पेडणेकर, मालवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन आंगणे यांनीही उपस्थिती दर्शवली.
बक्षीस वितरण समारंभ उपप्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. घोष व श्री. भोर, सहाय्यक विभागीय अधिकारी सांगळे व भगत, वरिष्ठ केंद्र अधिकारी विशाल विश्वासराव, केंद्र अधिकारी जितेश गोरुले आणि सुरज चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.
माजी आमदार शाम सावंत, महाराष्ट्र राज्य सचिव निखिल शेडगे, माजी राष्ट्रीय पदाधिकारी पंडितशेठ पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू माणिक (बंधू) साटम तसेच विविध नामांकित संघांचे माजी खेळाडू यांचीही उपस्थिती लाभली. भविष्यात अशाच राज्यस्तरीय स्पर्धा नियमित आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
