You are currently viewing कविता संग्रह रुपस्पंदन

कविता संग्रह रुपस्पंदन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*

 

 

कविता संग्रह – रुपस्पंदन

कवयित्री सौ रुपमती पांडुरंगराव देशमुख

प्रणाली प्रकाशन

पृष्ठसंख्या १००

 

नुकतेच काव्यनिनाद साहित्य समूहाचे 22 फेब्रुवारी ला साहित्य संमेलन झाले. त्यावेळी पुस्तक प्रकाशनाचाही एक कार्यक्रम झाला, यावेळी बरीच पुस्तके प्रकाशित झाल्याचं कळलं त्यापैकीच एक पुस्तकाबद्दल मी आज लिहिणार आहे.

नाव तुम्हाला कळलंच आहे. हा एक कविता संग्रह आहे. हो बरोबर ओळखलतं तुम्ही! सौ रुपमती पांडुरंगराव देशमुख पूर्णा नगर, चिंचवड, पुणे च्या प्रणाली प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ प्रणाली पंडित ने अतिशय सुंदर रेखाटलेले आहे.

पुस्तक उघडल्याबरोबर प्रथम कवयित्रीने अतिशय नम्रतेने आपल्या सासऱ्यांना आपले लेखन अर्पण केलेले आहे. त्यानंतर मनोगतात तिने थोडक्यात ह्या पुस्तकाचा उद्देश सांगत सगळ्यांचे आभार मानले आहेत. प्रस्तावना थोर साहित्यिक प्रा शरदचंद्र काकडेंची असून त्यांच्या मित्रपरिवारातील चार मोठया साहित्यिकांच्या शुभेच्छा आहेत. एकंदर ८१ कविता असलेल्या या संग्रहातील सगळ्या कविता अष्टाक्षरीत आहेत. कवयित्री अतिशय भावुक उच्च घराण्यातील आहेत. याची जाणीव प्रत्येक कविता वाचतांना होते. प्रत्येक कविता तोलामोलाची आहे ओढून ताणून यमक किंवा शब्द जुळविण्याचा अजिबात प्रयत्न नाही,पहिली कविता अर्थातच गणरायाला उद्देशून आहे. गणपतीची सुंदर शब्दात प्रार्थना व स्तुती वाचतांना मन प्रसन्न होते. तोच दुसरी कविता त्यांनी त्याच्या पुत्रासाठी तिसरी लाडक्या लेकीसाठी वपुढची हिरवा चुडा अर्थातच आपल्या पतीराजासाठी लिहिली आहे. पुढे चैतन्याची उधळण करीत कवयित्री पैंजण ,प्राजक्ताची फुले ,तोरण, साद,लिहिता लिहिता अरे संसार संसार लिहिते कवितेत संसारात सुखदुःखे तर आहेतच परंतु संसार म्हणजे रेशमाचे मृदु बंध कवयित्री लिहिते तेंव्हा त्यांच्या मनाची कोमलता लक्ष्यात येते तोच पुढच्या काही कवितेत त्या निसर्गात रमलेल्या दिसतात मध्येच नारीच्या विविध रूपांचे वर्णन करतात तर कधी आजीची गोधडी लिहितांना आजीची ही आठवण काढतात,सप्तसुर आयुष्याचे यात आयुष्य कसे असते ह्याचे वर्णन करतात तर शिवशंकराची स्तुती करतांना त्या देवीच्या नऊ रूपांचे अतिशय श्रद्धेने वर्णन करतात लगेच पैठणी बद्दल प्रेम व्यक्त करतात दिवाळी कवितेत दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचे महत्व सांगतात , हिवाळ्यातली थंडी कशी असते ह्याचे वर्णन वाचतांना आपण तल्लीन होतो तोच साहित्य देवतेची पूजा करून लागतीब संतश्रेष्ठ ज्ञानेश्वराबद्दलची आपला आदर व्यक्त करतात त्यांची भावना पाहून अंतर्मुख व्हावे तोच बालपण दे ग देवा ही कविता वाचकांना लहानपणात घेऊन जाते मराठ्यांचा उज्जवल इतिहास त्या विसरलेल्या नाहीत राजमाता जिजाबाई शंभू राज्याभिषेक सोहळा या कविता इतिहासाची आठवण करून देतात संघर्षात ठाम रहा सांगत त्या मंगळ सूत्र ,पदर लिहीत स्त्री जीवनाचे कंगोरे स्पष्ट करतात मी असे म्हणेन की रुपमती ताईंनी वेगवेगळ्या विषयावरील सगळ्या कविता अतिशय सुरेख लिहिल्या आहेत कुठेही शब्दांची जराशीही ओढाताण नाही भरीचे शब्द नाही एकाच काव्यप्रकारात आणि जीवनाशी संबंधित अनेक गोष्टीवर इतके सुंदर लिहिणे हे येरागबाळ्याचे काम नाही

प्रत्येक विषय अतिशय नाजूकपणे हाताळला आहे

एखादी सुगरण कोणताही पदार्थ आपले कौशल्य लावून चांगलाच करते तसे रुपमती ताईंनी ८१ विषयावरील प्रत्येक कविता अष्टाक्षरीत लिहिली आहे. कविता वाचायला सुरुवात केल्यावर ती पूर्ण वाचण्याचा मोह वाचक टाळू शकत नाही अशा सुरस कवितांचे शीर्षक शुद्ध तेव्हडेच आकर्षक आहे एकाच प्रकारच्या काव्यप्रकारात इतक्या उत्स्फुरतेने लिहिणे ही साधी सरळ कामगिरी निश्चित नाही परंतु हे शिवधनुष्य त्यांनी सहजतेने पेलले आहे प्रत्येक कविता खूप छान सजविली आहे त्यांनीप्रत्येक कविता सुंदर शब्दांच्या नक्षीदार कोंदणात ठेवून उंचीवर नेलेली आहे यातून त्यांच्या संवेदन शील मनाची तरलता दिसून येते

मला माहित आहे त्यांचे वैयक्तिक जीवनही असेच आहे अतिशय संस्कारित असे हे घरंदाज देशमुख कुटुंब! अतिशय अगत्यशील ! सगळे शालीन गुण दाटीवाटीने ह्या काव्यसंग्रहात पुरेपूर उतरले आहेत स्वतः रुपमती ताई च्या बोलण्या वागण्यात त्याच्या नावाला साजेसे सगळे गुण पुरेपूर उतरलेले आहेत त्यामुळे संग्रहाला दिलेले रुपस्पंदन हे नाव अतिशय सार्थ वाटते

रुपमती ताईंचे लेखन असेच बहरत राहो ही शुभेच्छा!

 

मुद्रक शामला पंडित (दीक्षित)’

दीपक मोरे

प्रथमावृत्ती ९ फेब्रुवारी २०२६

मूल्य २२५ /- रुपये

 

 

प्रतिभा पिटके

अमरावती

प्रतिक्रिया व्यक्त करा