*… झाले संतांचे दर्शन! – ह. भ. प. सुप्रिया साठे – ठाकूर*
*पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव*
पिंपरी (दिनांक : २० मार्च २०२६) ‘धन्य आजी दिन |
झाले संतांचे दर्शन |
झाली पापा तापा तुटी |
दैन्य गेले उठाउठी ||’
श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी ह. भ. प. सुप्रिया साठे – ठाकूर यांनी कीर्तनसेवा रुजू केली. याप्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधू जोशी, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सदस्य गतिराम भोईर, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांची उपस्थिती होती. सुप्रिया साठे या उच्चशिक्षित असून वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांनी आपल्या कीर्तन आणि प्रवचनसेवेचा प्रारंभ केला. आजतागायत सुमारे पाच हजारांहून अधिक कीर्तन आणि प्रवचनसेवा करीत त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये समाज प्रबोधन केले आहे. वयाच्या अठराव्या वर्षांपासून जगद्गुरू तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात महिलांची स्वतंत्र दिंडीचे आयोजन करण्यात सुप्रिया साठे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात सुप्रिया साठे यांनी जगद्गुरू तुकोबांच्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या ओघवत्या परंतु परखड शैलीतून सद्यःस्थितीतल्या सामाजिक अपप्रवृत्तींवर कोरडे ओढून उपस्थितांना अंतर्मुख केले.
चिंचवड येथील श्री हनुमान भजनी मंडळ, श्री काळभैरवनाथ उत्सव समिती आणि श्री काकड आरती भजनी मंडळांनी साथसंगत केली. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

