शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धडक
कणकवली
आशिये येथील रास्त दराच्या धान्य दुकानावरून फेब्रुवारी महिन्याचे धान्य वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध होत नाही. याबाबत तातडीने चौकशी करून कारवाईची मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे केली.
याबाबत पुरवठा निरीक्षक यांना प्रत्यक्ष रेशन दुकानावर जाऊन पाहणी करण्याच्या सूचना देत, धान्य वितरण त्वरित करण्यास सांगण्यास येत असल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, राजू राठोड महेश कोदे, आशियेच्या माजी सरपंच रश्मी बाणे, जगन्नाथ आजगावकर, शाखाप्रमुख संदीप जाधव व इतर उपस्थित होते.
१० फेब्रुवारी रोजी धान्याची उचल होऊनही अद्याप धान्य वितरित झालेले नाही. धान्य वितरणाला एवढा विलंब का? असा सवाल करण्यात आला. यावेळी सेल्समन बदलला आहे. त्याबाबतची कार्यवाही १८ रोजी पूर्ण झाल्यावर तातडीने धान्य वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी धान्य वितरणास विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच या धान्याचे पूर्ण वितरण झाल्याशिवाय नवीन चलन लावण्यात येऊ नये अशी मागणी सौ. बाणे यांनी केली.