You are currently viewing कणकवलीतील कुत्रे निर्बीजिकरण केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कणकवलीतील कुत्रे निर्बीजिकरण केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कणकवलीतील कुत्रे निर्बीजिकरण केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

कामकाज शिस्तबद्ध ठेवण्याच्या सूचना; नियमांनुसार कार्यवाहीचे निर्देश

कणकवली

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कणकवली येथील ABC (Animal Birth Control) तसेच नगरपंचायतच्या कुत्रे निर्बीजिकरण केंद्राला सोमवारी (दि. १६ मार्च) भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. यावेळी केंद्रातील विविध नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीची सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेची माहिती घेण्यात आली.
पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या SUO MOTO WRIT PETITION (Civil) No(s). 5 of 2025 आणि प्राणी जन्म नियंत्रण (Animal Birth Control) नियम, 2023 नुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, नगर पालिका प्रशासन सह आयुक्त विनायक औंधकर, कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील, पशुसंवर्धन विभागाचे श्री बिलोलीकर तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भेटीदरम्यान ABC केंद्रासाठी आवश्यक समिती स्थापन झाली आहे का आणि त्या समितीत प्राणीप्रेमींचा समावेश आहे का, याची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच डॉग कॅचिंगनंतर संबंधित कुत्र्यांना त्याच परिसरात सोडल्याची GPS फोटोसह नोंद ठेवणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
केंद्रात येणाऱ्या प्रत्येक कुत्र्याचा स्वतंत्र केस पेपर ठेवणे, त्याच्या आहाराची नियमित नोंद ठेवणे आणि अनावश्यकपणे जास्त काळ केंद्रात न ठेवता आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी सोडण्यावर भर देण्यात आला. ऑपरेशनपूर्वी कुत्र्यांना उपाशी ठेवणे तसेच शस्त्रक्रियेदरम्यान काढलेले अवयव फॉर्मालिनमध्ये जतन करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
याशिवाय आहार साहित्याचा स्टॉक रजिस्टर, भेट देणाऱ्यांची व्हिजिट रजिस्टरमध्ये नोंद, केंद्र परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवणे, कुत्र्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवणे यावरही विशेष भर देण्यात आला. गरोदर किंवा जखमी कुत्री पकडू नयेत तसेच सर्व कुत्र्यांचे लसीकरण अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले. लसीकरणानंतर टॅगिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, पाळीव कुत्र्यांचेही वेळोवेळी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नागरिकांना केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा