You are currently viewing तो राजहंस एक : सुरेश भट
Oplus_16908288

तो राजहंस एक : सुरेश भट

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा प्रा. सुनंदा पाटील लिखित भावस्पर्शी लेख*

 

*तो राजहंस एक : सुरेश भट*

 

मित्रांनो , बघता बघता २००३ ते २०२६ , ही तेवीस वर्षे कशी गेलीत कळलं नाही . ही तेवीस वर्षे म्हणजे भट साहेबांना आपल्यातून जाऊन तेवीस वर्षे झालीत. यावेळी ठरवलं की, आपल्या गुरूविषयी थोडसं लिहावं . कारण भट साहेबांची एक गझल सुद्धा नीट समजावून सांगण्याची आमची योग्यता नाही , हे मी जाणते. पण बराचसा काळ त्यांच्या सोबतीत गेला . सुमारे पंचेवीस /तीस वर्षे . त्यावेळची साहित्यिक वर्तुळे अगदी जवळून बघितली . गटबाजी बघितली . अनुभवली . तेव्हा कल्पना आली की , भट साहेबांनी मराठी गझल आपलीशी केली . ती रुजवली . मराठी गझल ऐकणारे कान आणि लिहिणारे हात पुढे आले. तिचा सर्व बाजुंनी विस्तार केला . तरीही साहित्य क्षेत्रातील एक उपेक्षितपण या हिमालयाच्या वाट्याला आलं , आणि कळलं की, *राजहंसाला स्वतःचं राजहंस असणं स्वतःच जगाला दाखवावं लागतं .* ते दिसलंच . मी ठरवलं , की आज काहीतरी लिहायचंच !

 

*एका तळ्यात होती बदके पिले सुरेख*

 

सर्वांना ठावूक आहे हे सुप्रसिद्ध गाणं . गदिमांच्या या एका गीताने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं . अगदी साधा शब्दार्थ घेतला तरी जाणवतं , की पाण्यात बदकापेक्षा वेगळ्या पद्धतीने पोहणाऱ्या त्या पिल्लाला कुणी आपल्यात घेतही नव्हतं खेळायला . खरं तर त्याचं चालणं , पोहणं सारंच डौलदार होतं . तरीही सारेच लोक त्याच्याकडे बोट दाखवून त्याला वेडं म्हणत. कारण ते पिल्लू वेगळं होतं . कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद माणूसही कुरूप ठरतो म्हणतात असंच काहीसं . अर्थातच त्याचं त्या पिल्लाला दुःख होई. कुणाशी बोलणार ते? त्यालाच चोची मारणं, धाक दाखवणं व्हायचं. त्यालाही वाटून जायचं की खरंच आपण वेडं तर नाही ना?.

 

पण एक दिवस वेगळा उगवला . आरशा सारख्या स्वच्छ पाण्यात त्यानं आपलंच रूप चोरून बघितलं . आणि काय आश्चर्य , की त्याचं त्यालाच कळलं की तो , सामान्य नाही , तर असामान्य राजहंस आहे.

 

असं हे गोष्ट स्वरूपातलं काव्य / कथाकाव्य आणि गीत . अनेकांना हा अनुभव येतो . गटबाजी मधे सामान्यांचा जयजयकार होतो , आणि असामान्य व्यक्ती उपेक्षित राहते . त्या असामान्य माणसाला वाईट वाटतं . पण त्यावेळी त्या गाण्यातल्या राजहंसा प्रमाणे प्रत्येकानेच आपल्यातला नेमका राजहंस ओळखायला हवा.

 

माझे आदर्श असलेल्या एका कवीने तो ओळखला. कारण ही व्यक्ती तथाकथित सामान्य बदकांच्या पेक्षा निश्चितच वेगळी *एक राजहंस* होती.

 

“रविकिरण मंडळाची ” कवी मंडळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली होती. गेय कविता , गाणी घराघरात पोचली होती . ज्यांना गेय किंवा वृत्तबद्ध कविता जमत नव्हत्या ( पण हे कबूल कसं करणार ? ) ती मंडळी मुक्तछंदाकडे वळली. अर्थात कवी अनिलांनी जो मुक्त्तछंद सांगितला , त्यालाही एक अंगभूत लय होतीच. शिवाय अनिलांनी कितीतरी लयबध्द कविता लिहिल्या होत्याच , ज्यांची पुढे सुप्रसिद्ध गाणी झालीत. पण हा मुक्तछंद पुढे छंदमुक्तच झाला. आणि गद्यप्राय लेखन कविता म्हणून पुढे आलं . असो.

 

त्या काळात सर्वत्र हेटाळणीचे सूर पचवत , एक व्यक्ती राजहंस म्हणून उभी ठाकली. ती व्यक्ती म्हणजे *गझलसम्राट सुरेश भट .* बालपणी पोलिओ मुळे अधू झालेला पाय , सर्व सामान्य बुद्धीमत्ता लाभलेल्या या व्यक्तीने आपली शारीरिक ताकद ओळखली . दमसास ओळखला . त्याचा उपयोग पुढे लेखनात आणि गझल गायनात केला . सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या लेखणीची जादू त्यांनी ओळखली . काव्यातला अतिशय मोहक प्रकार म्हणजे गझल , ही मराठीत रुजवली . आणि केवळ रुजवूनच ते थांबले नाहीत , तर त्याला योग्य ते खतपाणी घालून तिचा डेरेदार वृक्ष बनवला. आज त्या वृक्षाची मधुर फळे आपण चाखतोय . रसिक या कल्पवृक्षातळी बसून गझल अनुभवतोय .

 

अमरावतीला जन्मलेले आणि आयुष्याचा बराच काळ नागपूरला काढलेले भटसाहेब . धंतोली मधे त्यांचं निवास स्थान होतं . आमचे करंटेपण म्हणजे विदर्भालाच ते नीटसे कळले नाहीत. . किंवा त्यांची दखल घ्यावी असं ” साहित्यिकांना ” वाटलं नाही. आपल्या जवळ एक तेजस्वी , लखलखता हिरा आहे हे वैदर्भीय विसरले होते . कारण बदकांचा कळप हाच त्यांचा आदर्श होता. तत्कालीन कवींनी मराठी गझलेला कविता किंवा एक साहित्य प्रकार समजण्याचंच नाकारलं . पण तेव्हाही आपल्या खणखणीत शेरांमधून सुरेश भट व्यक्तच होत राहिले. अनेकांना ते शेर ठावूक आहेत . क्लास सोबत मासलाही हा कवी हवासा होता. देखण्या मुशाय -या पासून तर अगदी पानठेल्या वरच्या माणसालाही भट साहेबांचे शेर पाठ होते. कारण ते शेर सार्वकालीक आहेत . क्लासपासून तर मासपर्यंत भट साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं त्यांच्या काही ओळी बघा.

 

*जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा*

*विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही*

 

आज महाराष्ट्रात आणि बाहेरही अशी पिढी तयार झाली आहे. स्वतः मधलं राजहंस असणं त्यांनी ओळखलं आणि ते राजहंसच होते . त्यांची थट्टा करणारे , त्यांना साहित्यिक न माणणारी बदकं कालौघात पाचोळ्यागत कुठे उडून गेलीत , कळलंही नाही.

 

या श्वासांनी कविता , गझल . लिहिणाऱ्या व्यक्तीने आपला आशीर्वादाचा हात माझ्याही डोक्यावर ठेवला तो डिसेंबर १९७९ मधे . चंद्रपूरला . आधी मी कविता लिहीत होते , अगदी ८ वी , ९ वी पासून . म्हणजे ६९ / ७० पासूनच .पण ती गझल आहे याची जाणीव मला दादांनी चंद्रपूरला १९७९ साली करून दिली. नुकतंच त्यांचं “रंग माझा वेगळा ” हे पुस्तक आलं होतं माझ्या वाचनात. अर्थात त्यांनीच दिलेलं . झपाटल्यागत वाचलं , आणि नंतर दादांनी गझल लेखनाचं योग्य मार्गदर्शन केलं . *”गझलनंदा “* हे टोपणनाव मला मिळालं .

 

मी स्वतः प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना

” दादांनी मला स्वतः मधला राजहंस ” ओळखायला शिकवलं . गेली कित्येक वर्षे निर्दोष गझल मी लिहीत आहे. मग माझाही एखादा शेर बोलू लागला ,

 

*तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्यापुढे पंचारती*

*आहे अशी तेजाळती समई जुनी माझ्या घरी*

 

किँवा

 

*कालच्या टाळलेल्यांनी आज का आर्जवे केली*

*इथे सत्कार करण्याची योजना चालली आहे*

 

किंवा

 

*रोवून पाय आहे आदर्श पर्वताचा*

*आहे स्थिरावलेली मी सैर भैर नाही*

 

सुरेश भट म्हणजेच दादा – लगावली , शुद्धलेखन , व्याकरण तपासून घ्यायला , नव्याने गझलतंत्र शिकणाऱ्यांना माझ्याकडे पाठवीत. साधारण पणे १९९४ पासून . तेव्हा मी परत नागपूरला आले होते. पण मी गझलगुरू झाले नाही . कारण मराठी गझलेचा साक्षात विश्वकोषच आमच्यापुढे होता . ही हिमालयाची उंची लाभलेली माणसं आम्ही जवळून बघितली , त्यांच्याकडे शिकलो , त्यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात सहभागी झालो , त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं , त्यांची मुलाखत घेतली .खरंच आमच्या पिढीला , मला स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटतो कधीकधी .

 

काय होतं की,*कुबड्यांचा राज्यात बांधेसूद माणूससुद्धा कुरूपच दिसतो .* कारण अशी माणसं ही वेगळीच असतात , हे आम्ही जाणलं . बदकं लगेच ओळखायला येतात , कारण *नीरक्षीर विवेक* त्यांच्याकडे नसतो. वाघाचं कातडं ओढलेले लबाड कोल्हे तेव्हाच कळतात , जेव्हा . साक्षात एखादा खरा खुरा वाघ पुढ्यात येतो.

*” जववरी ते तववरी*

*जंबूक करी गर्जना*

*जव त्या पंचानना*

*देखिले नाही रे बाप “*

 

आजही असे जंबूक सर्वत्र दिसतात . हे वेगळे !

 

डायनिंग टेबल वरच्या खुज्या बांबूला आम्ही बांबू मानतच नाही . कारण आम्ही झाडीपट्टीच्या लोकांनी आकाशाचा वेध घेणारे वेळूवन प्रत्यक्ष बघितले आहे.

 

मित्रांनो आजही बदकांच्या कळपांची कमतरता नाही . त्या कळपात राहूनही *स्वतःचं राजहंसपण जपणं गरजेचं आहे.* अर्थात *कुणालाही आपण राजहंस आहोत , हे सांगावं लागत नाही . काळच ते ठरवीत असतो.*

 

आता माझीही एक गझल !

 

*माझा विचार आहे*

 

*अस्तास सूर्य जाणे अंतीम सार आहे*

*मज नेमके कळाले अंधार फार आहे*

 

*सांभाळले घराला जैसे जमेल तैसे*

*मज शेवटी कळाले मी मात्र भार आहे*

 

*जे घाव सोसण्याला हासून बोलले मी*

*कानात शब्द आले ‘नखरेल नार आहे ‘*

 

*परजून शस्त्र होते डोळ्यात वासनांचे*

*मी ओळखून गेले हा एक वार आहे*

 

*भावास सोबतीला घेऊन चालले मी*

*पुसले मला जगाने ‘हा कोण यार आहे’*

 

*कुल्टा कुणी म्हणावे निंदा कुणी करावी*

*शस्त्राहुनी जगाच्या जिव्हेस धार आहे*

 

*जेथे सनातन्यांनी मरणे कठीण केले*

*तेथे जगावयाचा माझा विचार आहे*

 

“आज जागतिक मराठी गझल दिवस !

दादांना विनम्र अभिवादन !!!”

 

*प्रा.सुनंदा पाटील*

*( गझलनंदा )*

८४२२०८९६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा