*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सत्यसंकल्प..*
संकल्प करा हो संकल्प करा हो
सत्याचा संकल्प रोज करा हो..
सत्य हे शिव सत्य सुंदर
ध्यानात ठेवा तोच परमेश्वर..
सत्य आचरता भय ना कशाचे
मार्गच दिसती पहा ते यशाचे..
सत्य सावली हो अनुसरा तयाला
पळवून लावी पहा ते भयाला..
सत्याची चाड असते जयांना
दु:खेच जाती आपसुक लयाला..
खडतर मार्ग पण सत्याचा हो
भितीच वाटे पण दुर्जनाला…
पापी कुणी तो डावलता सत्य
कर्माची शिक्षा येथेच तयाला..
न्यायनिवाडा येथेच होतो
सत्याचा वाली तरुनच जातो..
भिती न शिवते कधीही मनाला
सत्यच तारी अशा त्या नराला..
सत्य आचरा हो सत्यच भजा
मनग्वाही त्यास मनच राजा..
नकोच साक्षी सत्यास कोणी
समोरचा तो आपसूक जाणी..
डोळ्यांत दिसती अपराधी भाव
खजिल चेहरा उघडा तो डाव..
करावे कशाला असत्य काम
निघून जाई जीवनातून राम..
सत्यच शिव सत्यच सुंदर
सत्यच आहे मनाचे मंदिर…
मंदिर त्यात मन नित्य ठेवा
जगास वाटेल तुमचाच हेवा..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
